सध्या कोरोनामुळे जिल्ह्यातील नव्हे देशभरातील नागरिकांची झोप उडाली आहे. त्यात आता मध्य प्रदेशासह इतर काही राज्यांमध्ये बर्ड फ्लू आजाराची लागण झाल्याचे समोर आले आहे. धुळे जिल्ह्यात जरी कोंबड्यांचा मृत्यू झाला नसला तरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाली आहे. भीतीचे वातावरण जरी असले तरी मागणी मात्र कमी झालेली दिसून येत नाही. त्यामुळे भाव नेहमीप्रमाणे स्थिर आहेत. बर्ड फ्लू आजाराच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाने दक्षता घेण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात कुक्कुटपालन करणाऱ्या नागरिकांसह पोल्ट्री फार्मचालकांनाही बर्ड फ्लू आजाराची लक्षणे, घ्यावयाची दक्षता याबाबत माहिती दिली जात आहे. जिल्ह्यात बर्ड फ्लूचे रुग्ण आढळून आलेले नाहीत. इतर राज्यांमध्ये रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर ही दक्षता घेतली जात असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले.
पशुसंवर्धन विभागाकडून अशी घेतली जाते काळजी
n पोल्ट्री फार्मवरील किंवा आपल्या घरातील, शेतातील एखादा पक्षी मृत पावला तर त्याची माहिती पशुवैद्यकीय विभागाला देणे गरजेचे आहे. पशुवैद्यकीय विभागातील तज्ज्ञांमार्फत मृत पक्ष्यांचे शवविच्छेदन केले जाते. याद्वारे त्या पक्ष्याचा कोणत्या कारणाने मृत्यू झाला याची माहिती समजू शकते. त्यामुळे मृत पक्षाची माहिती प्रशासनाला देणे गरजेचे आहे. त्यामुळे वेळीच उपाय योजना केल्या जाईल, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
लसीकरणाचा उपाय
बर्ड फ्लू हा सर्दीसारखा आजार आहे. कोंबड्यांना सर्दी होऊन त्यांचा श्वास गुदमरतो आणि त्या गतप्राण होतात. लसीकरण त्यावर उपाय आहे.
जिल्ह्यात बर्ड फ्लूचा अद्याप धोका आढळून आलेला नाही. मात्र पशु संर्वधन विभागाकडून आवश्यक ती काळजी व नियोजन करण्यात आलेले आहेत. त्यासाठी वेळोवेळी जनजागृती केली जात आहे.
- डाॅ. राजेंद्र लंघे,
पशुसंवर्धन अधिकारी