धुळे : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर बससेवा सुरै झाली आहे. जिल्ह्यातील ८० टक्के बसेस रस्त्यावर धावू लागल्या आहेत. केवळ २० टक्के बसेस आगारातच थांबलेल्या आहेत. बस सुरै न झाल्याने काही गावातील नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर निर्बंध कडक करण्यात आले होते. मे महिन्यापासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे. तसेच मृत्यूदरही कमी झाला आहे. त्यामुळे निर्बंध हटवून बससेवादेखील सुरु करण्यात आली होती. बससेवा सुरु झाल्यानंतर चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती मिळाली. तालुक्याच्या ठिकाणी किंवा शहरात येण्यासाठी नागरिकांना एसटी महामंडळाच्या बसचा मोठा आधार असतो. मात्र कोरोना आल्यानंतर मागील दीड वर्षापासून बससेवा कधी बंद तर कधी सुरु असते. त्याचा मोठा फटका महामंडळाला बसतो आहे. तसेच आरोग्याच्या कामासाठी किंवा शासकीय कार्यालयातील कामासाठी येणाऱ्या नागरिकांचीही गैरसोय होत होती. मात्र आता बसेस पुन्हा रस्त्यावर धावू लागल्याने वाहक व चालकांमध्येही उत्साह दिसून येत आहे.
या गावांना बस कधी सुरू होणार?
लांब पल्ल्याच्या सर्व बसेस सुरू झाल्या आहेत. ग्रामीण भागातील बसफेऱ्यांचे प्रमाण मात्र त्या तुलनेत कमी आहे. शिरपूर तालुक्यातील सांगवी, पळासनेर, रोहिणी, खंबाडे या गावांना अजूनही बसची प्रतीक्षा आहे.
बस सुरू न झाल्यामुळे या परिसरातील नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. तसेच साक्री तालुक्यातील मांजरी, विरखेल, पारगाव या गावातही बस सुरू झालेली नाही.
प्रवाशांना खासगी गाड्यांचाच आधार -
ज्या गावातील बसफेऱ्या सुरू झाल्या नाहीत तेथील लोकांना अजूनही खासगी वाहनांचाच आधार घ्यावा लागत आहे. तसेच ग्रामीण भागात सुरू झालेल्या फेऱ्यांचे प्रमाण कमी आहे. फेऱ्यांमध्ये वाढ करण्याची मागणी ग्रामीण भागातील नागरिकांकडून केली जात आहे. टप्प्या-टप्प्याने ग्रामीण भागातील सर्व फेऱ्या सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे परिवहन विभागाकडून सांगण्यात आले.
काय म्हणतात प्रवास करणारे...
बससेवा सुरू झाल्याने आनंद झाला आहे. बऱ्याच दिवसांपासून बस बंद असल्याने शहरात येण्यासाठी खासगी वाहतूक व्यवस्थेचाच वापर करावा लागत होता. बस सुरू झाली असली तरी बहुतेक गावांच्या फेऱ्या अद्यापही सुरू झालेल्या नाहीत. तसेच बसफेऱ्यांची संख्या वाढवावी.
- प्रवासी
साक्री तालुक्यातील बहुतेक आदिवासी भागातील बसफेऱ्या सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. आदिवासी भागातील बसफेऱ्या सुरू झाल्या तर वेळ व श्रम दोन्ही वाचतील. लवकरात लवकर बसफेऱ्या सुरू कराव्यात.
- प्रवासी