खलाणे येथील रहिवासी गुमानसिंग परमार-(गिरासे) यांना कोरानाची लक्षणे दिसून आल्याने त्यांनी चाचणी केली, ती पॅाझिटिव्ह आली. त्यांच्यावर डॉक्टराच्या सल्ल्याने प्राथमिक उपचार करण्यात आले, परंतु तब्येतीत सुधारणा होत नव्हती. त्यामुळे डॅाक्टरांनी त्यांना धुळ्याला घेऊन जाण्याचा सल्ला दिला. वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. त्यात एच, आरसीटी स्कोअर २५ पैकी २३ तर ऑक्सिजन लेव्हल ६५ ते ७० होती. त्यामुळे रुग्णाचा परिवार धास्तावला. धुळे येथील खासगी कोविड सेंटर नेले असता, सदर रुग्णाची ऑक्सिजन पातळी व स्कोर पाहूनच दवाखान्यातील डॉक्टरांनी बेड शिल्लक नाही, असं सांगून मोकळे होत होते. धुळ्यात कुठेही बेड मिळाला नाही. पैसा असून ही काही उपयोग होत नव्हता. शेवटी त्यांना जिल्हा रुग्णालयात नेले. तेथेही बेड शिल्लक नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, नातेवाइकांनी विनंती केल्यावर डॉक्टरांनी वाट पाहा, असे सांगितले. ही सर्व परिस्थिती गुमानसिंग गिरासे पाहत होते . त्यामुळे सोबत असलेल्या मुलाला उपचाराऐवजी घरी घेऊन जाण्याचा आग्रह धरला. कोमलसिंग गिरासे या मुलाला सांगितले की, मला काहीच होणार नाही, तर तू काळजी करू नको, असे वडिलांच्या मुखातून शब्द बाहेर पडले आणि मुलाला मोठा हुरूप आला आणि वडिलांना खलाणे येथे घरी आणून विलगीकरणात ठेवण्यात आले व घरचा उपचार करण्याचे यांनी ठरविले आणि कोरानावर विजय मिळविण्याचा बाप-लेकाने संकल्प केला होता. घरी गृहविलगीकरकणात उपचार करण्यात आले. त्यामुळे प्रकृती सुधारत गेली. काही दिवसांनी केलेल्या चाचणीत त्यांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला. आत्मविश्वासाच्या बळावर व कुटुंबाच्या सहकार्यामुळे त्यांनी कोरोनावर मात केली.
प्रतिक्रिया
जिद्द व चिकाटीच्या जोरावर, परिवाराच्या व मुलाच्या पाठबळावर कोरानावर सहज मात केली आहे. याबरोबरच प्राणायाम व योगासने केली. शुद्ध शाकाहारीचे सेवन केले. तरी कोरानाला घाबरू नका, कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करा.
गुमानसिंग गिरासे
खलाणे ता.शिंदखेडा