धुळे/शिरपूर : मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात दारु घेवून येणारी पिकअप व्हॅन सांगवी पोलिसांनी पकडली. ही कारवाई शनिवारी दुपारी शिरपूर तालुक्यातील रोहिणी ते खंबाळे गावादरम्यान घडली. पोलिसांना पाहून चालक फरार झाला. पोलिसांनी ८७ हजार ४८० रुपयांची दारु आणि ५ लाखांची पिकअप व्हॅन जप्त केली. एक पिकअप व्हॅन मध्यप्रदेशातून अवैधरित्या दारु खरेदी करुन तस्करीच्या मार्गाने महाराष्ट्रात विक्री करीता येणार असल्याची गोपनीय माहिती सांगवी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना मिळाली. माहिती मिळताच सांगवी पोलिसांच्या पथकाने संशयित वाहनाचा शोध घेण्यास सुरुवात केली. शिरपूर तालुक्यातील नवागाव लगत काही अंतरावर समोरुन रोहिणी ते खंबाळेकडे एक पिकअप व्हॅन येताना दिसली. पाेलिसांना पाहून चालकाने रस्त्यालगतच्या दाट झाडांचा फायदा घेत पळ काढला. पोलिसांनी जवळ येवून वाहनाची तपासणी केली असता त्यात ८७ हजार ४८० रुपये किंमतीच्या बिअरच्या बाटल्या आणि एमएच १९ एस ६५०४ क्रमांकाचे ५ लाख रुपये किंमतीचे पिकअप व्हॅन असा एकूण ५ लाख ८७ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. फरार चालकाविरुध्द सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपअधीक्षक अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाल सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील व त्यांच्या पथकाने केली.