धुळे - येथील भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत १७ मातांचे मृत्यू झाले. मागील काही वर्षात माता मृत्यूची संख्या घटली असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. तज्ज्ञ डॉक्टर, अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांमुळे माता मृत्यूचे प्रमाण कमी करण्यात यश मिळाल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. भूषण राव यांनी सांगितले.
वर्षभरात एकूण ५ हजार २७१ प्रसूती हिरे वैद्यकीय महाविद्यालयात झाल्या. त्यापैकी १ हजार ८७७ सिझर झाले आहेत तर ३ हजार ३३२ नॉर्मल प्रसूती झाल्या आहेत. मागील वर्षात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला होता. त्यामुळे हिरे वैद्यकीय महाविद्यालय कोविड रुग्णालय घोषित करण्यात आले होते. तर नॉन कोविड रुग्णालय वेगळे करण्यात आले होते. कोरोना काळातही नॉन कोविड रुग्णालयाच्या माध्यमातून सेवा दिल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रसूती होऊ शकल्या.
जुलै ते सप्टेंबर मध्ये प्रसूतीची संख्या कमी -
जुलै ते सप्टेंबर या काळात जिल्ह्यात कोरोनाने कहर केला होता. कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती. तसेच मृतांची संख्याही वाढली होती. या काळात हिरे महाविद्यालयातील प्रसूतीची संख्या कमी झाली होती. प्रत्येक महिन्याला हिरे मध्ये ४०० ते ७०० प्रसूती होतात. जुलै ते सप्टेंबर या महिन्यात प्रत्येकी १०० पेक्षा कमी प्रसूती झाल्या आहेत. जुलै महिन्यात ५९, ऑगस्ट ३२ व सप्टेंबर मध्ये ९१ प्रसूती झाल्या आहेत. बाधित रुग्णांची संख्या वाढल्याने या महिन्यात खासगी रुग्णालयात प्रसूतीची संख्या वाढली असावी किंवा घरीच प्रसूती करणे पसंत केले असावे.
मार्च महिन्यात सर्वाधिक प्रसूती -
मार्च महिन्यात सर्वाधिक ७७२ प्रसूती झाल्या आहेत. त्यापैकी २८४ सिझर झाले आहेत तर ४७५ नॉर्मल प्रसूती झाल्या आहेत. या महिन्यात एका महिलेचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाला होता. तसेच जानेवारी, फेब्रुवारी या महिन्यातही ७०० पेक्षा अधिक प्रसूती झाल्या आहेत. ऑगस्ट महिन्यात सर्वात कमी ३२ प्रसूती झाल्या आहेत. त्यापैकी ६ सिझर तर २६ नॉर्मल प्रसूती झाल्या.
एप्रिल महिन्यात सर्वाधिक मृत्यू -
मागील वर्षभरात १७ मतांचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला. त्यापैकी सर्वाधिक माता मृत्यू एप्रिल महिन्यात झाले. एप्रिलमध्ये ३ माता दगावल्या. तर जानेवारी व ऑगस्ट महिन्यात एकाही मातेचा मृत्यू झालेला नाही. तसेच फेब्रुवारी, मे, ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यात प्रत्येकी दोन मातांचा मृत्यू झाला आहे.
उच्च रक्तदाब, रक्तक्षय आदी मुख्य करणे -
प्रसूतीदरम्यान मातेचा मृत्यू होण्यामागे अनेक कारणे असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. त्यात उच्च रक्तदाब, रक्तक्षय आदी मुख्य करणे आहेत. अनेकवेळा प्रसूतीच्या वेळी अधिक रक्तक्षय होतो. त्यामुळे मातेचा मृत्यू होण्याची शक्यता असते. तसेच उच्च रक्तदाब व झटका येणे या कारणांमुळेही मृत्यू होतात. अनेक प्रकरणांमध्ये उशिरा येण्यामुळे मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रसूतीसाठी वेळ न दवडता रुग्णालयात दाखल होणे फायदेशीर ठरते.
मागील काही वर्षात माता मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. हिरे वैद्यकीय महाविद्यालयात महिला व प्रसूती विभागात तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. तसेच अत्यावश्यक सुविधा उपलब्ध आहेत. विविध ऑपरेशनही याठिकाणी होतात. गर्भवती महिलांनी वेळोवेळी तपासणी करावी. व लवकर रुग्णालयात दाखल व्हावे. त्यामुळे सुखरूप प्रसूती होऊ शकते.
- डॉ.भूषण राव, सहयोगी प्राध्यापक, हिरे महाविद्यालय