धुळे : महापालिकेतर्फे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाठविण्यात आलेल्या संशयित ४0 रुग्णांपैकी १६ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने मोहीम अधिक तीव्र केली आहे. मात्र संशयित रुग्णांची संख्या आता कमी होत असल्याचेही सूत्रांनी सांगितले. शहरातील साक्री रोडवरील मोगलाई व गवळीवाडा परिसरापासून डेंग्यू निर्मूलनासाठी मोहीम राबविण्यास सुरवात झाली. या भागातील पाण्याच्या साठय़ात डेंग्यू आजारास कारणीभूत होणार्या डासाच्या अळ्य़ा आढळून आल्याने सर्व साठे रिकामे करण्याची कारवाई करण्यात आली. परंतु हळूहळू शहरातील प्रत्येक भागातून डेंग्यूचे संशयित रुग्ण वाढू लागल्याने मनपाने धुरळणी, अँबेटिंग व पाण्याचे साठे खाली करण्यास सुरवात केली. मात्र डेंग्यूने शहराभोवती अधिक विळखा घट्ट केला.जानेवारी ते ऑक्टोबरदरम्यान शहरातील डेंग्यूच्या रुग्णांची संख्या १0६ पर्यंत पोहचली आहे. त्यात सर्वाधिक रुग्णांची वाढ ही ऑक्टोबरमध्ये झाल्याने यंत्रणा खळबळून जागी झाली. विशेष म्हणजे गेल्या ऑक्टोबर महिन्यात विविध भागात रुग्णसंख्येत वाढ झाली. १३६ संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्यावर त्यातील ८६ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. तर १ ते ७ नोव्हेंबरदरम्यान ४0 संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेण्यात येऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यातील १६ रुग्णांना डेंग्यू असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती मनपाच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. धुळे : शहरात रविवारी रात्री झालेल्या पावसामुळे पुन्हा डेंग्यूच्या उत्पत्तीस्थळांमध्ये वाढ झाली आहे. ही उत्पत्तीस्थाने नष्ट करण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.शहरात गेल्या महिन्याभरापासून डेंग्यूच्या साथीने नागरिक हैराण झाले आहेत. तर ही साथ आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे फॉगिंग, अबेटिंग व पाण्याचे साठे रिकामे करण्याची कारवाई सुरू आहे. परंतु परतीच्या पावासाने या मोहिमेवर पाणी फिरविले आहे. शहरातील विविध भागांमध्ये विक्रेत्यांनी फेकलेले शहाळे, माठ विक्रेत्यांकडे पडलेले माठ, दुचाकी, चारचाकींचे पंक्चर काढणार्या दुकानांसमोर पडलेल्या रिकाम्या टायरांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे पुन्हा डासांच्या उत्पत्तीस्थानांमध्ये वाढ झाल्याने आरोग्य विभागासमोर नव्याने आव्हान उभे राहिले आहे.
---------------
गेल्या आठवड्यात मंगळवारी झालेल्या पावसामुळे टायरची दुकाने, कुंड्यांची दुकाने, फळांची व मटण विक्रीच्या दुकानांबाहेरील माठांमध्ये साचलले पाणी खाली करण्यात आले होते. त्यात पुन्हा रविवारी रात्री पाऊस झाल्याने संकट वाढले. संबंधित दुकानदारांना पुन्हा स्वच्छतेच्या सूचना दिल्या आहेत. - अर्पणा पाटील, मलेरिया विभागप्रमुख, मनपा