मागील तीन-चार वर्षांपासून पोलीस भरतीसाठी अथक परिश्रम घेणाऱ्या तरुणांना पोलीस भरतीचा जीआर रद्द झाल्याने आता गावाकडे परतावे लागणार आहे. जिल्हाभरातील अनेक तरुण उस्मानाबाद शहरात पोलीस भरतीसाठी येऊन प्रयत्न करतात. यामध्ये अनेकांच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे. कमी वेळेत नोकरी मिळविण्याचा एकमेव मार्ग पाेलीस भरतीचा असल्याने अनेक तरुण -तरुणी दिवस-रात्र मेहनत घेतात. मात्र, आता भरतीच लांबणीवर पडल्याने तयारी करणाऱ्या तरुणांचा हिरमोड झाला आहे.
मागील तीन वर्षांपासून पोलीस भरतीची तयारी करीत आहे. भरतीसंदर्भात घोषणा झाल्याने आनंद झाला होता. मात्र, आता भरतीचा जीआर रद्द करण्यात आल्याने आशेवर पाणी फेरले आहे. भरतीची तयारी सुरू ठेवली आहे. आता भरतीचा जीआर केव्हा निघेल, याची प्रतीक्षा आहे. शासनाने लवकर भरतीप्रक्रिया राबवावी.
बालाजी औंटी, वाडी बामणी, ता. उस्मानाबाद
पदवीपर्यंत शिक्षण घेऊन कमी वेळेत नोकरी मिळविण्यासाठी पोलीस भरतीकडे वळलो. मागील दोन वर्षांपासून पोलीस भरतीची तयारी उस्मानाबाद शहरात करीत होतो. वाटले आता भरती होईल, असे वाटत असतानाच पुन्हा भरती लांबणीवर पडली आहे. त्यामुळे उत्साह कमी झाला आहे.
सचिन रोहिले
खामसवाडी, ता. कळंब
पोलीस भरतीबाबतचा जीआर निघाला होता. त्यानुसार तरुण मैदानावर सराव करीत होते. मात्र, न्यायालयाच्या निर्णयानंतर सदर अध्यादेश थांबविण्यात आला होता. नव्याने आरक्षणाच्या तरतुदीचा विचार करून सुधारणा केली जाईल. त्यानंतरच भरतीचा मार्ग माेकळा होणार आहे. या प्रक्रियेला किती वेळ लागेल हे सांगता येणार नाही. त्यामुळे तरुणांमध्ये नाराजी आहे.
अजय गायकवाड, कळंब
चौकट...९
९२० नागरिकांमागे केवळ १ पोलीस
उस्मानाबाद जिल्ह्यात जवळपास १६ लाख ५७ हजार लोकसंख्या आहे. पोलिसांची संख्या जवळपास १ हजार ८०० इतकी आहे. यात १०० अधिकाऱ्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात ८ तालुके असून, जिल्ह्यात पोलिस कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता आहे. विशेष म्हणजे ९२० नागरिकांमागे १ पोलीस कर्मचारी आहे.