सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल महिन्यात कोरोना महामारीची तीव्रता वाढली असल्याने संक्रमण अधिक वाढू नये, यासाठी येरमाळा ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीस सरपंच तबस्सुम सय्यद, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर राडकर, देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष संजय आगलावे, समाधान बेदरे, मंडल अधिकारी डी.एम. कांबळे, माजी सरपंच विकास बारकुल, उपसरपंच गणेश बारकुल, ग्रामसेवक अशोक आम्ले, तलाठी एस.आर. सय्यद यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीतच यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. या काळात होणाऱ्या सर्व देवीच्या पूजा या ठरावीक पुजाऱ्यांच्या व मानकरी यांच्या उपस्थितीत मंदिरातच होतील. यात्रा होणार नसल्याने भाविकांनी दर्शनासाठी येऊ नये. घरीच देवीच्या फोटोची पूजा करावी, असे देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष संजय आगलावे व समाधान बेंद्रे यांनी सांगितले. देवीची पालखी गावात येणार नसल्याने परगावच्या भाविकांनी चैत्र पौर्णिमा या दिवशी व चुना वेचणीच्या दिवशी गावात कोणीही येऊ नये. यासाठी गावाच्या चारही बाजूने पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे. त्यासोबतच चुन्याच्या रानातही पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर राडकर यांनी सांगितले. शिवाय, पौर्णिमेच्या दिवशी व चुना वेचण्याचा दिवस, असा दोन दिवसांचा येरमाळा गावात जनता कर्फ्यू राहणार असल्याचे स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आले.
येडेश्वरीची यात्रा रद्द, दोन दिवस जनता कर्फ्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:33 IST