बलसूर : उमरगा तालुक्यातील बलसूर गावाला ग्रामपंचायतीकडून सध्या पंधरा दिवसांआड पाणी पुरवठा होत आहे. यामुळे ग्रामस्थांना घागरभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून, ग्रामपंचायतीच्या नियोजनाअभावी ही वेळ ओढवल्याचा आरोप ग्रामस्थांमधून केला जात आहे.
बलसूर गावची लोकसंख्या तेरा ते चौदा हजार असून, भूकंपानंतर या गावाचे अन्य ठिकाणी पुनर्वसन झाले आहे. गावात २००५ साली जवळपास सव्वा ते दीड कोटी रुपये खर्च करून शासनाची जलस्वराज पाणी पुरवठा योजना राबविण्यात आली. सदर योजनेतून तांड्यासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा करण्यासाठी बलसूर साठवण तलाव क्र. २ च्या बांधाखाली सिंचन विहीर तसेच टाकी उभारण्यात आली, तसेच गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी बलसूर साठवण तलाव क्र. १ च्या बांधाखाली सिंचन विहीर आणि गावासाठी दोन लाख लिटर क्षमतेची टाकी उभारण्यात आली. याशिवाय, गावात पाइप लाइनही करण्यात आल्याने सततच्या पाणी टंचाईपासून कायमस्वरूपी मुक्ती मिळेल, अशी आशा ग्रामस्थांना होती; मात्र ग्रामपंचायत प्रशासनाच्या नियोजनाअभावी उन्हाळा असो वा पावसाळा, गावात चौदा ते पंधरा दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे.
दोन महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे यंदा साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरला. यामुळे गावाला पाणी पुरवठा करणारी सिंचन विहीरही तुडुंब भरली आहे. असे असतानाही ग्रामस्थांना मात्र घागरभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असून, काही जण विकतच्या पाण्यावर तहान भागवित आहेत. पाणी टंचाईबाबत ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे विचारणा केली असता, उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारुन नेत असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून केला जात आहे.
चौकट...........
सौरपंपाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष
पूर्वीची गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी बलसूर पाझर तलावाच्या बांधाखाली असलेली विहीर सध्या पाण्याने तुडुंब भरली आहे; मात्र त्याचा वापरच नसल्याने त्याचे पाणी शेतकरी वापरत आहेत. शिवाय, काळनिंबाळा तलावाच्या बांधाखालीही एक विहीर असून, तलाव भरल्यामुळे त्यातदेखील भरपूर पाणी आहे. यातून जलवाहिनीद्वारे पाणी टाकीत सोडले जाते; परंतु या जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती लागली आहे, तसेच या विहिरीवर ७ लाख ८५ हजार रुपये खर्च करून वर्षभरापूर्वी सौर उर्जेवर आधारित १० एचपी क्षमतेचा सौरपंपही बसविण्यात आला; परंतु अतिवृष्टीमुळे त्याचे काही नुकसान झाले असून, आठ ते दहा महिन्यांपासून याच्या दुरुस्तीकडे ग्रामीण पाणी पुरवठा विभाग देखभाल दुरुस्ती कक्षाचेही दुर्लक्ष झाले आहे.
पाइपलाइन आहे, पण टाकी नाही !
मल्लिकार्जुन वस्तीवर जलस्वराज योजनेतून काही ठिकाणी केवळ पाइपलाइन करण्यात आलेली आहे; परंतु अद्याप टाकी उभारली गेली नसल्याने पंधरा वर्ष उलटले तरी येथे नळाद्वारे पाणी पुरवठा होऊ शकलेला नाही. तीनशे ते चारशे लोकसंख्या असलेल्या या वस्तीवर जलस्वराज योजना हे नाव केवळ ऐकण्यापुरतेच राहिले आहे. येथील रहिवाशांनादेखील पंधरा वर्षांपासून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
कोट........
बलसूर साठवण तलावाच्या बांधाखालील गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीवरील विद्युत ट्रान्सफार्मरवर जास्तीचा भार असून, त्यातच आठ तास विद्युत पुरवठा होत असल्याने टाकीमध्ये सुरळीत पाणी पुरवठा होत नाही. पाणी पुरवठ्यासाठी गावठाण फिडरहून स्वतंत्र विद्युत ट्रान्सफार्मरची मागणी करण्यात आली आहे. त्याचे काम झाल्यास सुरळीत पाणी पुरवठा होईल.
- एस. आर. पांढरे, ग्रामविकास अधिकारी
गावात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर असून, गावात चौदा ते पंधरा दिवसांआड पाणी पुरवठा होत आहे. अनेक जण टँकरचे पाणी विकत घेत आहेत; परंतु गोरगरिबांनी काय करायचे? लाखो रुपये खर्च करूनही ग्रामपंचायतच्या ढिसाळ नियोजनामुळे पाणी असून, ग्रामस्थांना टंचाईचा सामना करावा लागत आहे.
- संदीप बिराजदार, ग्रामस्थ.
जलस्वराज योजना राबवून पंधरा वर्षे झाली; परंतु अद्याप नळाला पाणी आले नाही. लाखो रुपये खर्च करूनही मल्लीकार्जुंन वस्तीवरील नागरिकांना सतत पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या योजनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच वस्तीवरील पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावावा.
व्यंकट गव्हाणे, रहिवासी, मल्लीकार्जुन वस्ती
फोटो - 1)काळनिंबाळा साठवण तलावाच्या बांधाखालील विहिरीवर सौर उर्जेवर आधारित सौर पंप बसविण्यात आले आहे; मात्र काही कारणांमुळे ते ही नादुरुस्त असल्याने ते दहा महिन्यांपासून बंद आहे.
2)नागरिकांना पाण्यासाठी अशी वनवन भटकंती करावी लागत आहे.
3)गावात अशा प्रकारे टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत आहे.
4)काळनिंबाळा तलावाच्या बांधाखालील पाणी पुरवठा करणारी विहीर अशी तुडूंब भरुन आहे.