मार्डी येथे दारु अड्ड्यावर धाड
उस्मानाबाद : लोहारा तालुक्यातील मार्डी येथील दारू अड्ड्यावर लोहारा पोलिसांनी १४ जानेवारी रोजी धाड टाकली. यात तुळशिराम देवकर यांच्याजवळ देशीदारूच्या १२ बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी मद्य जप्त करुन संबंधिताविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यातंर्गत गुन्हा नोंद केला.
दारू पिऊन ट्रक चालविला चालकाविरुद्ध गुन्हा
उस्मानाबाद : सांगाेला येथील चालक तुळशिराम नरळे हा मद्यप्राषण करून मानवी जीवितास धोका होईल, अशा प्रकारे सोलापूर-नळदुर्ग महामार्गावरील गौलाई चौकात १४ जानेवारी रोजी ट्रक चालवित असताना नळदुर्ग ठाण्याच्या पोलीस पथकास आढळून आला. यावरून ट्रक चालकाविरुद्ध मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कळंब येथून दुचाकी लंपास
उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील बोर्डा येथील बाळासाहेब शेळके यांनी त्यांची दुचाकी (एमएच २५ एए ४७४१) ही कळंब येथील अण्णा भाऊ साठे चौकात ११ जानेवारी रोजी उभी केली होती. ती अज्ञात चोरट्याने चोरून नेली. सर्वत्र शोध घेऊन दुचाकीचा शोध लागत नसल्याने शेळके यांनी कळंब पोलीस ठाण्यात दुचाकी चोरी गेल्याची तक्रार दिली. यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध १४ जानेवारी रोजी गुन्हा नोंद झाला.
सांजा येथे जुगार अड्ड्यावर छापा
उस्मानाबाद : आनंदनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने सांजा येथील जुगार अड्ड्यावर १४ जानेवारी रोजी छापा टाकला. यावेळी सुधीर चांदणे यांच्याजवळ कल्याण मटका जुगार चालविण्याचे साहित्य व १ हजार ४० रोख रक्कम आढळून आली. यावरून पथकाने जुगार साहित्य व रक्कम जप्त करून संबंधिताविरुद्ध गुन्हा नोंद केला.