उस्मानाबाद : येथील वसंतदादा नागरी सहकारी बँकेने संधी देऊनही वसुली व अन्य कामकाजात सुधारणा न केल्याने ठेवीदारांच्या रकमा परत करण्यास ते असमर्थ असल्याचा दावा करीत आरबीआयने त्यांचे लायसन्स रद्द केले आहे. तब्बल ४५ कोटी रुपयांच्या ठेवी असलेल्या या बँकेवर ही अंतिम कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे.
उस्मानाबाद येथील वसंतदादा नागरी सहकारी बँक आर्थिक अडचणीत आली होती. २०१७ सालीच रिझर्व्ह बँकेने यात लक्ष घालून नव्या ठेवी स्वीकारण्यास बँकेवर निर्बंध घातले होते. शिवाय, तेव्हा थकबाकीदारांकडील येणी वसूल करून त्यातून ठेवीदारांच्या रकमा परत करण्याबाबतची कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात आले होते. साधारणत: तीन वर्षांच्या कालावधीतही यामध्ये फारशी सुधारणा झाली नसल्याचेच या कार्यवाहीवरून दिसून येत आहे. आता ही बँक ठेवीदारांच्या रकमा परत करण्यास असमर्थ असल्याचा दावा करीत रिझर्व्ह बँकेने लायसन्स रद्द करून यापुढे कोणत्याही प्रकारचे बँकिंग व्यवहार करण्यावर पूर्णत: निर्बंध आणले आहेत, तसेच सहकार विभागाला बँकेवर तातडीने अवसायक नेमून ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सहकार विभागाने तातडीने वसंतदादा बँकेवर सहायक निबंधक विकास जगदाळे यांची अवसायक म्हणून नेमणूक केली आहे.
४० हजार ठेवीदारांचे देव पाण्यात...
वसंतदादा नागरी सहकारी बँकेचे सुमारे ४० हजारांवर ठेवीदार आहेत. सुरुवातीच्या काळात बँकेने संपादन केलेल्या विश्वासाच्या जोरावर मोठ्या संख्येने ठेवीदार तयार झाले. त्यांच्या सुमारे ४५ कोटी रुपयांच्या ठेवी बँकेकडे असल्याचे अवसायक विकास जगदाळे यांनी सांगितले. दरम्यान, २०१७ मध्ये पहिल्यांदा कार्यवाही झाल्यापासूनच ठेवीदारांत अस्वस्थता पसरली होती. तेव्हापासून हे ठेवीदार देव पाण्यात ठेवून बसले आहेत.
५ लाखांपर्यंतच्या ठेवींना प्राधान्य....
विमा कंपनीच्या माध्यमातून ठेवीदारांना त्यांच्या ठेवी मिळतील. यामध्ये ५ लाख रुपयांपर्यंत ठेवी ठेवलेल्या नागरिकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. दरम्यान, बँकेकडे ८२ ठेवीदार हे ५ लाखांपेक्षा अधिक ठेव ठेवलेले आहेत. त्यांना विमा कंपनीच्या माध्यमातून ५ लाख व उर्वरित रक्कम बँकेकडील जमा रकमेतून मिळू शकेल, असा दावा अवसायकांनी केला आहे.
ठेवी मिळतील परत : अवसायक
वसंतदादा नागरी सहकारी बँकेच्या ठेवीदारांना काळजी करण्याची गरज नाही. ठेवींवर विमा काढलेला असतो. त्यामुळे आता या विम्याच्या माध्यमातून ठेवी परत करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी ठेवीदारांनी त्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड व इतर बँकेत खाते असल्यास
त्याचे पासबुक झेरॉक्स आणून द्यावे. क्लेम फॉर्मसोबत ही कागदपत्रे जोडून ठेवीदारांच्या स्वाक्षऱ्यांसह पाठविल्यानंतर ठेवी परत मिळण्यास मदत होईल.
-विकास जगदाळे, अवसायक