उस्मानाबाद : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेस जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. मागील आठ दिवसांत फ्रंटलाइनवर काम करणाऱ्या तब्बल २ हजार ९१४ जणांनी लस टोचून घेतली. लस घेण्यातही महिला कर्मचारी अग्रभागी असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.
एप्रिल महिन्यापासून जिल्ह्यात काेरोना विषाणूचा शिरकाव झाला होता. जुलै-ऑगस्ट महिन्यांपासून बाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली. या आजारावर प्रभावी औषध नसल्यामुळे ५७४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे प्रत्येकाचे लक्ष हे लस कधी मिळेल, याकडे लागले होते. अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर १६ जानेवारीपासून उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालय, तुळजापूर उपजिल्हा रुग्णालय, उमरगा उपजिल्हा रुग्णालयातील केंद्रावर लसीकरणास प्रारंभ झाला. प्रत्येक केंद्रास १०० जणांना लस देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. पहिल्या दिवशी तिन्ही केंद्रांवर एकूण २१३ जणांनी लस घेतली. पहिले दोन ते तीन दिवस अकारण भीतीपोटी कर्मचाऱ्यांनी लस घेण्याकडे पाठ फिरविली होती. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सकांसह डॉक्टरांनी लस टोचून घेतल्यानंतर आरोग्य कर्मचारी लस घेण्यासाठी पुढे येऊ लागले आहेत. मागील आठ दिवसांत २ हजार ९१४ जणांनी लस घेतली आहे. यात ९०२ पुरुष, दोन हजार १२ महिलांचा समावेश आहे. दरम्यान, आरोग्य विभागाकडून जिल्ह्याच्या लसीकरणातील स्थानाबाबत माहिती प्राप्त होत नसल्याचे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले.
लसीकरणात महिला आघाडीवर
जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात शासकीय व खासगी वैद्यकीय सेवेत फ्रंटलाइनवर काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत आहे. लस घेण्यासाठी कोविन ॲपवर ९ हजार १०० जणांनी नोंदणी केली असून मागील आठ दिवसांत यातील २ हजार ९१४ जणांनी लस घेतली आहे. यामध्ये २ हजार १२ महिलांचा समावेश आहे.
डोसचा दुसरा साठाही झाला प्राप्त
पहिल्या टप्प्यात नोंदणी केलेल्या ९ हजार १०० जणांना पहिला व दुसरा असे दोन डोस देण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात १० हजार ५० डोस उपलब्ध झाले आहेत. दुसऱ्या डोससाठी दुसऱ्या टप्प्यात ९ हजार लस आरोग्य विभागास प्राप्त झाल्या आहेत.
जिल्ह्यात उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा या तीन ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करून लसीकरण मोहीम राबविली जात होती. आता कळंब, वाशी, भूम, परंडा, लोहारा या ठिकाणीही लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाला आहे. त्यामुळे लसीकरणाचे प्रमाण वाढू लागले आहे. १४ फेब्रुवारीपर्यंत पहिला टप्पा पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून सांगण्यात आली.
कोट...
जिल्ह्यात २८ जानेवारीपर्यंत २ हजार ९१४ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. लसीकरणासाठी केंद्राची संख्या वाढविण्यात आली असून सध्या प्रत्येक तालुक्यास एक केंद्र कार्यान्वित केले आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी ९ हजार डोस उपलब्ध झाले आहेत.
डॉ. हणुमंत वडगावे,
जिल्हा आरोग्य अधिकारी
जिल्ह्यात आतापर्यंत झालेले लसीकरण
उस्मानाबाद- १०३ टक्के
तुळजापूर- ८६ टक्के
उमरगा- ९७ टक्के
कुठे किती लसीकरण
उस्मानाबाद जिल्हा रुग्णालय- ८०९
तुळजापूर उपजिल्हा रुग्णालय- ७१४
उमरगा उपजिल्हा रुग्णालय- ६६५
कळंब उपजिल्हा रुग्णालय- १४६
परंडा उपजिल्हा रुग्णालय- १५७
भूम ग्रामीण रुग्णालय- १८५
वाशी ग्रामीण रुग्णालय- ११२
लोहारा ग्रामीण रुग्णालय- १२७