व्हिडीओची धमकी देत मुलीचा लैंगिक छळ
उस्मानाबाद : जिल्ह्यातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ झाल्याची घटना उघडकीस आली आहे. गावातून रस्त्याने पायी जात असताना चार जणांनी दुचाकी आडवी लावून आपल्याबरोबर न बोलल्यास तुझा व्हिडीओ व्हायरल करीन, अशी धमकी या आरोपींनी मुलीला दिली. यानंतर तिचा हात पकडून लैंगिक छळ केला. त्यांना हटकणाऱ्या मुलीच्या भावास जीवे मारण्याची धमकी आरोपींनी दिली. याप्रकरणी पोलिसांत शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतीच्या वादातून शेतकऱ्यास मारहाण
उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील पानगाव येथील एका शेतकऱ्यास वादातून मारहाण झाली आहे. येथील तुकाराम शिंदे हे आपल्या शेतात काम करीत असताना भाऊबंद इंदुबाई, फुलबाई, रामेश्वर, शिवाजी, माणिक यांनी शेतीच्या वादातून त्यांना शिवीगाळ करीत काठीने मारहाण केली. शिवाय, जीवे मारण्याची धमकीही दिली. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध येरमाळा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.