प्रभाग क्रमाक ११ बातमी
लोहारा : शहरातील प्रभाग क्रमाक ११ हा भाग इतर प्रभागाप्रमाणे भूकंपानंतर वसलेला आहे. या ठिकाणी काही भागात रस्ते, नाल्याचा प्रश्न मिटला असला तरी अजूनही काही भागात तो गंभीर आहे. विशेषत: जलस्वराज्य पाण्याच्या टाकीचे वॉल लिंकेज असल्याने वॉलच्या ठिकाणी पाणी साचते त्यामुळे परीसरात दुर्गधी पसरत आहे.
शहरातील प्रभाग क्रमाक ११ मध्ये शिवनगर, मारुती मंदिर, अक्सा चौक, ग्रामीण रुग्णायल, नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाचा परिसर येतो. या ठिकाणी मुलभूत सुविधेचा अभाव होता. परंतु, ग्रामपंचायतीने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला. या प्रभागामध्ये गणेश दुबे घर ते सुग्रीव माळी घरापर्यत व अशोक काटे घर ते दरेकर घरापर्यत कच्चे रस्ते करण्यात आले आहेत. शालिनी गायकवाड ते अमोल कासार घरापर्यत एका बाजुने नाली, दशरथ रोडगे ते मारुती रणदिवे घरापर्यत सिमेंट रस्ता तर जोगी घराजवळ पूल करण्यात आला आहे. दशरथ रोडगे ते जलस्वराज्य पाण्याच्या टाकीपर्यत दोन्ही बाजुने नाली, कामराज कांबळे घर ते कोकणे रस्ता, मारुती रोडगे ते सुभाष बिराजदार घरापर्यत सिमेंट रस्ता व नाली, सार्वजनिक शौचालय ते कोकणे घर व हम्मू खडीवाले ते संतोष माळी घर नाली, मारुती मंदीर ते शेख घर नाली, नागिनी भंडारे ते सार्वजनिक शौचालय एका बाजूने नाली, सिमेंट रस्ता, सार्वजनिक शौचालय ते कोकणे घर सिमेंट रस्ता, सातपुते घर ते गवंडी दोन्ही बाजुने नाली, सिमेंट रस्ता, बाबा गायकवाड ते मज्जिद सिमेंट रस्ता, आ.ज्ञानराज चौगुले यांच्या आमदार निधीतून मज्जिद जवळ बोअर घेण्यात आले आहे. यासाठी २ कोटी ४९ लाख रुपये खर्च करण्यात आला. तसेच शंभर टक्के शौचालये असलेले शहरातील हा पहिला वॉर्ड आहे. प्रत्येक शौचालयाला स्वखर्चाने रंगरंगोटी केली आहे. यामुळे तत्कालीन मुख्याधिकारी सोनल देशमुख यांच्या हस्ते सन्मानही करण्यात आला होता.
या प्रभागात बहुतांश रस्त्याची व नालीची कामे मार्गी लागली असले तरी राजेंद्र माळी दुकान ते बजरंग माळी घरापर्यत अद्याप ना रस्ता ना नाली. अक्सा चौक, मज्जिद परिसरात प्रमुख सिमेंट रस्ता व नाल्याचे काही काम वगळता अंतर्गत रस्त्याचा व नाल्याचा प्रश्न कायमच आहे. तसेच सुग्राव माळी ते गणेश दुबे घरापर्यत कच्चा रस्ता झाला असला तरी पावसाळ्यात चिखलाची दलल असते व नाल्या नसल्याने रस्त्याच्या कडेला घरासमोर पावसाचे पाणी थांबते. राजेंद्र माळी दुकान ते अशोक काटे घरापर्यत नाल्या नसल्याने पावसाचे पाणी थांबते. त्यात रस्ते, नाल्या नसलेल्या भागातही अशीच परिस्थिती आहे.
याच प्रभागात जलस्वराज्य प्रकल्पाची पाण्याची टाकी आहे. या टाकीतून शहरातील अनेक भागात पाणीपुरवठा होतो. परंतु, गवळी यांच्या घरासमोर रस्त्यावरच व कडेला पाईप लाईनला वॉल्व्ह बसविलेले असून, ते लिकेज असल्याने येथे पाणी साचते. यामुळे येथे बाराही महिने चिखलाची दलदल असते. यामुळे दुर्गधी पसरत असून, वॉल्व्ह बंद केल्यावर हेच पाणी पाईपलाईनमध्ये जाते. परत वॉल्व्ह चालू केल्यानंतर हे पाणी पाईपलाईनमध्ये गेल्याने थोडा वेळ नळाला दुषित पाणी येते. यामुळे या वॉल्व्हची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
चौकट.......
पाहणी असेल तरच स्वच्छतागृहात पाणी, वीज
याच प्रभागात ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागे सार्वजनिक शौचालय आहे. परंतु, येथेही पाण्याची सोय नाही. येथील नळाच्या तोट्या तुटलेल्या आहेत. कुठले पथक पहाणीस येणार असेल तरच येथे पाणी, विजेची सोय केली जाते, असे परिसरातील नागरीक सांगतात. त्यामुळे या सार्वजनिक स्वच्छतागृहात सर्व सुविधा उपलब्ध करून ते सुरू करावे, अशी मागणी होत आहे.
कोट.....
प्रभाग क्रमाक ११ मधील सिमेंट रस्ते, नाल्याची कामे केली असून, एकाच रस्त्याचे काम करू शकलो नाही, त्याची मला खंत आहे. तसेच कन्यारत्न पुरस्कार वचनपूर्ती कोरोनामुळे राहिली आहे. त्याचीही पूर्तता लवकरच केली जाणार आहे. मी स्वखर्चातून प्रभागातील वैयक्तिक शौचालयाला रंगरंगोटी केली आहे.
- सुनिता विजयकुमार ढगे,
नगरसेविका
या प्रभागात सिमेंट रस्ते, नाल्याची कामे काही ठरावीक भागात झाली असून, मुख्य रस्ते व अंतर्गत रस्त्याची, नाल्याची कामे होणे गरजेचे आहे. सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था, नादुरूस्त वॉल्व्ह यासह अनेक प्रश्न आजही कायम आहेत.
- जकीया मुखत्तार चाऊस, रहीवासी
प्रभाग क्रमाक ११ मध्ये निवडणुकीत दिलेल्या अश्वासनाची पूर्तता अद्याप झालेली नाही. ज्या भागात वस्ती आहे तो भाग सोडून जिथे कुणी राहत नाही अशा भागात म्हणजेच ग्रामीण रुग्णालयाच्या पाठिमागे सिमेंट रस्ता, नालीची कामे करण्यात आली. शिवाय, यांचा दर्जाही सुमार आहे.
- संजय दरेकर, रहीवासी
फोटो - लोहारा शहरातील प्रभाग क्रमाक ११ मध्ये जलस्वराज्य पाण्याच्या टाकीचे वॉल्व्ह लिकेज असल्याने बाराही महिने येथे असे पाणी साचलेले असते.