उस्मानाबाद : महामार्गाच्या सर्व्हिस राेडलगत उभ्या केलेेल्या ट्रकची टाकी फाेडून अज्ञातांनी सुमारे ३०० लिटर इंधन लंपास केले. ही घटना ३ जुलै राेजीच्या रात्री २ वाजता घडली. चाेरीची ही घटना समाेर आल्यानंतर ट्रकधारकाने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील राजू अण्णासाहेब इटकूर यांनी आपला ट्रक (क्र. एमएच-१३ एक्स-४१३२) देशमुख वस्तीजवळील महामार्गाच्या सर्व्हिस राेडवर उभा केला हाेता. दरम्यान, ३ जुलैच्या रात्री २ वाजेच्या सुमारास एका कारमधून (क्र. एमएच-१३ सीयू-५१२१) आलेल्या तिघांनी ट्रकची इंधन टाकी फाेडून आतील सुमारे ३०० लिटर डिझेल लंपास केले. चाेरीची ही घटना समाेर आल्यानंतर ट्रकधारक इटकूर यांनी नळदुर्ग पाेलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. त्यावरून अज्ञात चाेरट्यांविरुद्ध भा.दं.सं.चे कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पाेलीस करीत आहेत.