कांबळे : ‘माझा गाव सुदर गाव’चा आढावा
उस्मानाबाद : ‘माझा गांव, सुंदर गांव’ हा उपक्रम गावाच्या सर्वांगीण विकासाचा उपक्रम असून, सर्वांच्या सहभागावरच या उपक्रमाचे यश अवलंबून आहे. त्यामुळे प्रत्येकाने या उपक्रमात सहभागी होणे आवश्यक आहे, असे मत जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिताताई कांबळे यांनी केले.
तालुक्यातील तेर येथे ‘माझा गाव, सुंदर गाव’ या उपक्रमांतर्गत चालू असलेल्या कामांचा आढावा कांबळे यांनी घेतला, तसेच यापुढे आणखी नेमकी कोणती कामे करणे अपेक्षित आहेत, याबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा परिषदेच्या यंत्रणेसोबत इतर विभाग आणि महसूल
प्रशासन यांचा समन्वय झाल्यास या उपक्रमास अपेक्षित यश मिळेल, असे त्या म्हणाल्या. यावेळी कांबळे यांनी
गावच्या परिसराबरोबरच तेरणा नदीचा परिसर तसेच संत श्रेष्ठ गोरोबाकाकांच्या समाधी मंदिर परिसराची
पाहणी केली. ग्रामपंचायत कार्यालयाला भेट देऊन ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसराची, अभिलेख्यांची पाहणी करून सदर अभिलेख्यांच्या अद्यावतीकरणाच्या अनुषंगाने काही महत्त्वाच्या सूचना केल्या.
यावेळी कांबळे यांच्यासोबत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांच्यासह पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, जि. प. कार्यकारी अभियंता नितीन भोसले, सरपंच नवनाथ नाईकवाडी, दीपक खरात यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.