माल खरेदीनंतर सात दिवसांत मिळणार पेमेंट
उमरगा : शासनाने ठरवून दिलेल्या निकषांनुसार २०२०-२१ रब्बी हंगामातील हरभरा खरेदीसाठी येथील बाजार समिती आवारात नाफेड व जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले.
श्री स्वामी समर्थ सेवा सहकारी संस्थेमार्फत सुरू करण्यात आलेल्या या केंद्राचा प्रारंभ रविवारी बाजार समितीचे सभापती मोहियोदीन सुलतान यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा मार्केटिंग अधिकारी मनोज वाजपेयी, बाबूराव म्हेत्रे, संस्थेचे चेअरमन विलास व्हटकर, महेश पाटील, किसन पाटील, बाजार समितीचे संचालक व्यंकटराव पाटील, सचिन जाधव, बालाजी जाधव, गोविंदराव औरादे, काशिनाथ पाटील, बळिराम सुरवसे, आदी उपस्थित होते.
यावेळी सभापती सुलतान यांनी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना या शासकीय योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले. बाजार समिती सचिव सिद्धप्प्पा घोडके यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
दरम्यान, शेतकऱ्यांनी सातबारा, ८ अ, पीकपेरा, बँक पासबुक झेरॉक्स, आधारकार्ड व मोबाईल क्रमांक आदी कागदपत्रे या संस्थेकडे देऊन ऑनलाईन नोंदणी करावी. माल खरेदीनंतर सात दिवसांत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी मनोज वाजपेयी यांनी यावेळी दिली.