बालाजी आडसूळ
(लोकमत पाठपुरावा)
कळंब : कोट्यवधी रुपयांच्या लातूर रस्त्याचे कळंब तालुका हद्दीतील काम बंद करून कंत्राटदाराची यंत्रणा गायब झाली असल्याचे समोर आले होते. आता यापैकी अर्धवट राहिलेल्या कामाची धुरा अन्य कंपनीवर सोपवण्यात आल्याची माहिती हाती आली असून, यामुळे राहिलेले काम पूर्ण होण्याची आशा निर्माण झाली आहे. दरम्यान, याविषयी आ. कैलास पाटील यांनी कार्यकारी अभियंता यांच्याशी संवाद साधत कामास गती देण्याची सूचना केली आहे.
कळंब-लातूर या राज्यमार्गाची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ‘हायब्रिड ॲन्युईटी’ उपक्रमांतर्गत सुधारणा करण्यात येत आहे. यासाठी जवळपास १८८ कोटी रुपयांच्या कामाचा ठेका कल्याण टोल्स नावाच्या कंपनीने घेतला होता. यानुसार मागच्या दोन वर्षांपासून सदर रस्त्याचे काम संबंधित कंपनीने औरंगाबाद येथील एका ठेकेदार एजन्सीला सोबत घेऊन ‘जॉईंट व्हेंचर’ करत कामास सुरुवात केली होती. कळंब, वाशी तालुक्याला लातूर शहराशी जोडणारा व शिराढोण, मुरूड, राजंणी, नायगाव, पाडोळी या प्रमुख शहर, गावांना ‘कनेक्टिव्हिटी’ देणारा हा प्रमुख रस्ता विकसित होत असल्याने समाधान व्यक्त केले जात होते. मात्र, संबंधित कंत्राटदार कंपनीच्या जोडीदार कंपनीला सदर काम मुदतीत पूर्ण करण्याचे आव्हान पेलवत नसल्याचे समोर आले आहे. यामुळेच आजच्या घडीला केवळ ४० टक्के काम पूर्ण झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
याबाबत मुख्य ठेकेदार कंपनीला बांधकाम विभागाने वारंवार अवगत करून दंडात्मक कारवाईचा इशारा दिला होता. असे असतानाही कामास गती मिळणे तर दूरच उलटपक्षी ‘ब्रेक’ लागला होता. यातच लोहटा पूर्व ते डिकसळ या लांबीत तर आहे तो रस्ता खोदून काम बंद केल्याने रस्त्याला ‘पाणंद’ रस्त्याचे स्वरूप आले आहे. यातील चिखलमय रस्त्याचा अनेक वाहनधारकांना प्रसाद भेटला आहे. यासंबंधी ‘लोकमत’ने गुरुवारच्या अंकात सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून या भागातील विसेक गावातील लोकांना सोसावा लागत असलेला त्रास मांडला होता. यानंतर लोकप्रतिनिधीनी याकडे विशेष लक्ष दिले आहे. स्थानिक आ. कैलास पाटील यांच्यासह अनेकांनी बांधकाम विभागाला फैलावर घेतले आहे.
दरम्यान, लातूर-कळंब रस्त्याचे सद्यस्थितीत २० किलोमीटर लांबीत डांबरीकरण पूर्ण झाले असल्याचे तर ३० किलोमीटर लांबीत ‘सब ग्रेड’चे काम प्रगतीपथावर असल्याचे सांगण्यात येते. याशिवाय मुख्य ठेका घेतलेल्या कंपनीने आपला जोडीदार बदलला असून, नंदुरबार येथील एका एजन्सी समवेत ‘जॉईमट व्हेंचर’ करत रखडलेले काम हाती घेतले आहे. यानुसार शुक्रवारी काही यंत्रणा कामावर दाखल देखील झाली आहे.
चौकट...
पाच ‘माईल स्टोन’ पूर्णत्वाकडे कधी जाणार ?
लातूर कळंब रस्त्याची एकूण ६० किलोमीटर एवढी लांबी हायब्रिड ॲन्युईटी अंतर्गत विकसित करण्यात येत आहे. यासाठी १८८ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. सदर काम पाच ‘माईल स्टोन’मध्ये पूर्ण करणे बंधनकारक होते. यात दहा, तीस, पन्नास, पंच्याहत्तर व नव्वद टक्के असे टप्पे होते. यानुसार पाच टप्प्याला बारा टक्केप्रमाणे रक्कम मिळणार होती. असे असताना आजवर केवळ ४० टक्के काम पूर्ण झाले आहे.
तर दररोज लाखोंचा दंड....
लातूर-कळंब या मार्गाच्या ६० किलोमीटर लांबीत कळंब तालुक्यातील २९ किलोमीटर तर लातूर तालुक्यातील २३ किलोमीटर लांबीचा समावेश आहे. ३१ मार्च २०२२ पर्यंत आवश्यक असलेला ‘माईल स्टोन‘ गाठणे साध्य न झाल्यास संबंधित ठेकेदार कंपनीला दररोज लाखो रुपयांचा दंड आकाराला जावू शकतो, असे सूत्रांनी सांगितले.
आमदाराचा संवाद, तोपर्यंत मुरूम टाकणार
दरम्यान, लातूर-कळंब रस्त्यावरील रखडलेल्या कामाची ‘लोकमत’मध्ये प्रसिध्द झालेल्या बातमीची दखल घेत आ. कैलास पाटील यांनी कार्यकारी अभियंता थोरात यांच्याशी संवाद साधत कामास गती देण्याची व तात्पुरती दुरुस्ती करण्याची सूचना केली. यानुसार तात्पुरता मुरूम टाकणे व नव्या एजन्सीमार्फत काम तत्काळ सुरू करण्याचे निश्चित झाले असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले.