कळंब : तालुक्यातील आवाड शिरपुरा येथील सुपुत्र तथा प्रसिद्ध मृदंगाचार्य प्रताप आवाड यांच्या मृदुंगाचा नाद बांगलादेशची राजधानी ढाका येथे घुमला असून, बांगलादेशच्या पन्नासाव्या स्वातंत्र्यदिनी आयोजित सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यासमोर झालेल्या संगीत रजनीत त्यांच्या मृदंग वादनाची साथ लाभली आहे. मांजरा काठावरच्या शेतकऱ्याच्या पोराची ही भरारी चांगलीच कौतुकाचा विषय ठरली आहे.
काळाच्या ओघात भारतीय प्राचीन वाद्य मागे पडत असताना तालुक्यातील आवाड शिरपुरा येथील सुपुत्र प्रताप आवाड यांनी ‘पखवाज’ अथवा ‘मृदंग’ या पारंपरिक वाद्यावर आपल्या बोटांची जादू निर्माण केली आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्याचं पोर असलेल्या प्रताप यांनी पुढे आपल्या कलेचा सातासमुद्रापार झेंडा फडकावला आहे. तपोवनचे सुभाष महाराज देशमुख, पद्मश्री शंकरबापू आपेगावकर यांच्या गुरुकुलात पखवाजवादक उद्धवबापू आपेगावकर, गोपाळ जाधव, पुणे येथे वसंतराव घोरपडकर, अरविंदकुमार आझाद, ध्रुपदगायक पंडित उदय भवाळकर अशा थोर पखवाजवादक गुरूंच्या सान्निध्यात तब्बल दोन दशकं साधना केलेल्या प्रताप आवाड यांनी यापूर्वी जवळपास १६ देशांत प्रवास करीत आपले मृदंग वादन सादर केले आहे.
यात देश-विदेशातील नामवंतांच्या समवेत अमेरिका ते आफ्रिकन देश असे पंचवीसपेक्षा जास्त विदेश दौरे केले आहेत. विदेशात शंभरावर, तर देशात चारशेवर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कार्यक्रमात पखवाज वादन सादर केले आहे. अशा या हरहुन्नरी कलाकारासाठी शुक्रवारचा दिवस तसा करिअरमधील 'ब्लॉक बस्टर फ्रायडे' ठरला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोरोनानंतरच्या पहिल्या बांगलादेशच्या विदेश दौऱ्यात प्रताप आवाड यांना स्थान मिळाले असून, बांगलादेशची राजधानी ढाका येथे साजऱ्या करण्यात आलेल्या पन्नासाव्या सुवर्णमहोत्सवी स्वातंत्र्य दिन व राष्ट्रपती शेख मुजीबुर्रहमान यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात पद्मभूषण अजय चक्रबर्ती यांच्यासमवेत मृदंग वादन सादर करण्याची संधी मिळाली आहे.
चौकट...
दोन देशांच्या पंतप्रधानांसमोर कलेचं सादरीकरण
बांगलादेश येथील राष्ट्रीय समारोहामध्ये आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यासमोर निमंत्रित कलाकार म्हणून पद्मभूषण पंडित अजय चक्रबर्ती यांच्यासमवेत मृदंगाची साथ प्रताप आवाड यांनी दिली. यावेळी तबला शोमेन सरकार यांनी, तर की-बोर्डसाठी तन्मय चटर्जी यांची साथ होती. भारत सरकारच्या ‘इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन’ यांनी पंतप्रधान दौऱ्यात हा कार्यक्रम आयोजित केला होता.
मैत्रीचा खास राग आळवला
बांगलादेशच्या सुवर्णमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी आयोजित केलेल्या पंतप्रधानांच्या विशेष दौऱ्यात स्थान मिळाल्याचा प्रताप आवाड यांना मोठा आनंद आहे. याचे तालुक्यात कौतुक होत आहे. विशेष म्हणजे, या सोहळ्यात पद्मभूषण अजय चक्रबर्ती यांनी दोन्ही देशांच्या मैत्रीपूर्ण संबंधाचे औचित्य साधत विशेष असा ‘मैत्री’ या नव्या रागाची रचना सादर केली. यास साथ दिली ती प्रताप आवाड यांच्या मृदुंग वादनाने. प्रताप यांच्या मृदुंगाचा नाद अन् थाप बांगलादेशच्या राजधानीत घुमल्याने तालुक्यातील एका कलाकाराने प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावर पंतप्रधानांच्या शासकीय दौऱ्यात सहभागी होण्याचा मान मिळविला आहे.