तामलवाडी : थकीत वीज बिलासाठी पाणी पुरवठा योजनेची वीज तोडल्यामुळे तुळजापूर तालुक्यातील सांगवी (काटी) झोपडपट्टी भागातील रहिवाशांना सध्या तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. शिवाय, शेतीसाठीदेखील अपुरी वीज मिळत असल्यामुळे पिके धोक्यात आली आहेत.
सांगवी (काटी) झोपडपट्टी भागात जवळपास तीन नागरिक वास्तव्यास आहेत. या भागात ग्रामपंचायतीकडून नळाद्वारे पाणी पुरवठा केला जातो. या पाणी पुरवठ्याशिवाय येथील रहिवाशांना पाण्यासाठी दुसरे कुठलेही स्रोत उपलब्ध नाही. यासाठी साठवण तलावाखाली विहीर घेण्यात आली आहे. दरम्यान, या पाणी पुरवठा योजनेचे ५ लाख ६० हजार रुपये वीज बिल थकले आहे. यामुळे महावितरणने दोन दिवसांपूर्वी विहिरीवरील विद्युत पंपास होणारा वीज पुरवठा खंडित केला आहे. दरम्यान, नळाद्वारे होणारा पाणी पुरवठा बंद झाल्यामुळे येथील रहिवाशांना सध्या रानोमाळ भटकंती करावी लागत आहे.
एकीकडे पाण्यासाठी गावकऱ्यांची भटकंती सुरू असतानाच महावितरणकडून शेतीसाठीदेखील केवळ १ तास वीज उपलब्ध करून दिली जात आहे. यामुळे उन्हाळी पिके, फळबागा पाण्यावाचून अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्वरित वीज बिल भरून पुरवठा सुरळीत करून घ्यावा, अशी मागणी रहिवाशांमधून केली जात आहे.
चौकट
वीज बिल भरून सहकार्य करा
सध्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार थकीत वीज बिलाची वसुली सुरू असून, यासाठी वीज पुरवठाही खंडित करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तसेच ग्रामपंचायतींनी वीज बिलाचा भरणा करून वीज कनेक्शन तोडण्याची कार्यवाही टाळावी, असे आवाहन माळुंब्रा वीज उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता पी. एन. कवरे यांनी केले आहे.
शेतकऱ्याने केला मोफत पाणी पुरवठा
सांगवी झोपडपट्टी भागातील तीनशे नागरिकांचे पाण्यासाठी होणारे हाल लक्षात घेऊन येथील शेतकरी ज्ञानेश्वर मगर यानी स्वत:च्या विहिरीवरील विद्युत पम्प चालू करून तासभर मोफत पाणी पुरवठा सुरू केला केला. त्यामुळे या विहिरीवर पाणी भरण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. शाळकरी मुले, महिलाही पाण्यासाठी या ठिकाणी येत असल्याचे दिसत आहेत.