उस्मानाबाद : शेत, शिवरस्त्यावरुन होणारी शेतकऱ्यांतील वादावादी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुरु केलेल्या उपक्रमाला शेतकऱ्यांतून चांगला प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवारी जवळपास ३० वर्षांपासून बंद असलेला गोगाव-भंडारी हा शिवरस्ता प्रशासन व शेतकऱ्यांच्या पुढाकारातून मोकळा झाला.
करजखेडा सज्जा अंतर्गत असलेल्या गोगाव-भंडारी हा जवळपास दीड किलोमीटर अंतराचा शिवरस्ता अनेक वर्षांपासून बंद झालेला होता. यामुळे या अंतरातील सुमारे पन्नासवर शेतकऱ्यांची वाट अडली होती. इतरांच्या शेतातून वाट घालताना सतत वादाला तोंड फुटायचे. ही बाब लक्षात घेता महसूल विभागाने स्थानिकांची मदत घेत शेतकऱ्यांची बैठक घेऊन हा रस्ता खुला करण्याचा निर्णय घेतला. रस्त्याचे मोजमाप करून शुक्रवारी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. सुमारे दीड किलोमीटर अंतराचा रस्ता मोकळा करून येथे मातीकाम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पन्नासावर शेतकऱ्यांची सोय झाली आहे.
हासेगाव-गौरगाव, जवळा-बोरवंटी रस्ताही सुरु...
रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याच्या मोहिमेंतर्गतच शुक्रवारी हासेगाव ते गौरगाव पाणंदरस्त्यावरील अतिक्रमणे काढून टाकण्यात आली आहेत. रस्ता मोकळा करुन तो वापरासाठी खुला करुन देण्यात आला आहे. याप्रमाणेच जवळा ते बोरवंटी दरम्यानचा सव्वा किलोमीटर अंतराचा रस्ताही शुक्रवारी महसूल विभागाने शेतकऱ्यांच्या मदतीने खुला केला. या रस्त्याचा लाभ हा जवळपास १२० शेतकऱ्यांना होणार आहे.