येथील शाळेला आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा मिळाल्यानंतर गावकऱ्यांनी लोकसहभागातून शाळेचे रूपडे बदलले होते. त्यामुळे विद्यमान सरकारने आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा काढून घेतल्यानंतर गावकऱ्यांत तीव्र संताप व्यक्त होत होता. शिवाय, शाळा बंदसह इतर आंदोलनेही केली होती. परंतु, याकडे दुर्लक्ष करीत आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम बंद करून २०२०-२१ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडाळाच्या ८१ शाळा, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, शासकीय विद्यानिकेतने व नागरी भागातील शाळांचा समावेश करुन प्रथम टप्यात ४८८ आदर्श शाळांना मान्यता दिली आहे. याची जिल्हानिहाय यादी प्रसिध्द केली असून, यात उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील ईट, कळंब तालुक्यातील शिराढोण येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी जिल्हा परिषद शाळा, उमरगा तालुक्यातील बसलूर, लोहाऱ्यातील हिपरगा (रवा), उस्मानाबाद तालुक्यातील काजळा आणि सांजा, परंडा तालुक्यातील पिंपळवाडी, तुळजापुर तालुक्यातील खुदावाडी आणि वाशी तालुक्यातील वाशी जि. प. कन्या शाळेचा देखील समावेश आहे. याबाबतचा शासन निर्णय ५ मार्च रोजी काढण्यात आला आहे. या आदर्श शाळांचा अभ्यासक्रम बालभारतीचा असल्याने सोयी-सुविधा वाढविण्यात येणार आहेत.
या सुविधा आवश्यक
या आदर्श शाळांमध्ये लोकसहभाग, भविष्यात वाढती पटसंख्या व किमान १०० ते १५० पटसंख्या, शालेय अंगणात अंगणवाडी, आकर्षक शाळा इमारत, विद्यार्थ्यांनुसार वर्ग खोल्या, मुला-मुलींकरिता स्वतंत्र स्वच्छतागृह, पेयजल व हॅंडवाॅश, मध्यांन्य भोजन सुविधा व भांडार कक्ष, शैक्षणिक साहित्य, खेळाचे साहित्य, संगणक कक्ष, ग्रंथालय/वाचलय, व्हीसीआर कक्ष, विद्युतीकरण, शाळेला संरक्षण भिंत, सुरक्षित वाहतूक व्यवस्था, उत्कृष्ट शिक्षकांना देशांतर्गत व बाहेर प्रशिक्षणासाठी पाठविणे, पाचवी वर्गासाठी शिष्यवृत्ती परिक्षेची तयारी आदी सुविधा उपलब्ध असाव्यात, असे शासन निर्णयात म्हटले आहे.
कोट........
आंतरराष्ट्रीय मंडळाने जाहीर केलेला अभ्याक्रम विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी महत्त्वाचा होता. मात्र, तो बंद करून आदर्श शाळेचा निर्णय घेण्यात आला असून, तो दिशाभूल करणारा आहे.
- सुधीर महाजन, अध्यक्ष, शालेय समिती
आदर्श शाळेसाठी माझ्या शाळेची टीम सज्ज आहे. इतर शाळांसमोर वेगळा आदर्श निर्माण करण्याचा आमचा मानस आहे. शाळेच्या पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी सीएसआर, ग्रामपंचायत यांच्याकडे पाठपुरावा करुन विद्यार्थ्यांना आत्याधुनिक शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न राहील.
- सुनील आहिरे, मुुख्याध्यापक, शिराढोण
शिराढोण आदर्श जिल्हा परिषद शाळेसाठी ग्रामपंचायत मधील वित्त आयोगातून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करुन विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आवश्यक आत्याधुनिक सुविधा निर्माण करुन शाळेला प्रेरणादायी करण्यावर भर राहील.
- पद्माकर पाटील, सरपंच, शिराढोण