फोटो (२७-१) राहुल ओमणे
शिराढोण : पोलीस ठाण्याअंतर्गत सुरू असलेले अवैध धंदे बंद करावेत, या मागणीसाठी येथील सरपंच पद्माकर पाटील हे प्रजासत्ताक दिनी पोलीस ठाण्यासमोर उपोषणास बसले होते. यावेळी ग्रामस्थांनी देखील गाव बंद ठेवत या आंदोलनास पाठिंबा देत सहभाग नोंदविला.
पोलीस ठाणे हद्दीत मटका, जुगार, अवैध दारू विक्री यासारखे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. याबाबत सरपंच पद्माकर पाटील यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन हे धंदे बंद नाही झाल्यास प्रजासत्ताक दिनी उपोषणाचा इशारा दिला होता. यानंतर पोलीस प्रशासनाने कारवाईची मोहीम हाती घेतली. परंतु, तरीही छुप्या पध्दतीने हे धंदे सुरूच असल्याने सरपंच पाटील यांनी प्रजासत्ताक दिनी पोलीस स्टेशनसमोर उपोषण सुरू केले. यावेळी ग्रामस्थ, व्यापाऱ्यांनी देखील गाव बंद करुन पाठिंबा दिला.
दरम्यान, फौजदार वैभव नेटके यांनी दिलेल्या आश्वासनानंतर सायंकाळी पाटील यांनी आंदोलन मागे घेतले. मात्र, अवैध धंदे बंद नाही झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला. यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संजय दुधगावकर, तंटामुक्त अध्यक्ष नामदेव माकोडे, विजयकुमार गायकवाड, पंचायत समिती उपसभापती गुणवंत पवार, ग्रामपंचायत सदस्य पवन म्हेत्रे, दीपक पाटील, मंजूर डांगे, समियोदिन काझी, कुलदीप पाटील, विलास डावकरे, सुरेश माकोडे, सिकंदर खुरेशी आदींची उपस्थिती होती.
पोलिसांमुळे धंदे वाढले
अखिल भारतीय भ्रष्टाचार समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनास पाठिंबा दिला. यावेळी अवैध धंदे पोलिसांमुळे वाढले असल्याचा आरोप त्यांनी केला.
कोट.......
अवैध धंदे व्यावसायिकांवर धडक कारवाई करुन गुन्हे दाखल केले आहेत. हे धंदे कायमस्वरूपी बंद होईपर्यंत कारवाई सुरूच राहील.
-वैभव नेटके पोलीस उपनिरीक्षक शिराढोण.