बाजारात रिफाइंड म्हणून दाखल झालेल्या तेलाचा प्रवास आत्ता डबल, ट्रिपल रिफाइंड तेलापर्यंत पोहोचला आहे. याबद्दल अनेक मतप्रवाह आहेत. यातही उच्च तापमानावर निर्मिलेल्या या तेलात काही रासायनिक घटकांचा वापर होत असल्याने या तेलाच्या वापरातून काही अनावश्यक बाबींची देण मिळत आहे, तर काही महत्त्वाचे घटक दूर होत आहेत, असे बहुतांश तज्ज्ञांचे मत आहे. या स्थितीत पूर्वजांची देण असलेल्या लाकडी घाण्याला पुन्हा ‘ऊर्जितावस्था’ प्राप्त होत असून, शुद्ध, नैसर्गिक, सकसपणा असलेल्या लाकडी घाण्यातून गाळलेले तेल खाण्यावर अनेक जण भर देत आहेत.
रिफाइंड तेल घातक का?
रिफाइंड तेल आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामुळे आहारात कोल्ड प्रेस अशा कच्च्या घाण्यातील तेलाचा समावेश असावा. बाजारातील एक किलो तेलाची किंमत व त्यास लागणारी कच्ची सामग्री यांचा हिशोब जुळत नाही, हे वास्तव्य आहे. त्यातच रिफाइंडमध्ये अनावश्यक केमिकल वापरलेले तेल माथी मारले जाते. भारतात ‘ब्लेंडेड’ची अनुमती असल्याने हे घडते. यामुळे आरोग्याची मात्र हेळसांड होते. यातही वापरलेले तेल हे वर्षभर एकच न वापरता, अदलाबदल करून वापरणे उचित.
-डॉ. राजेंद्र बावळे, कळंब
म्हणून वाढताहेत हृदयरोगी...
स्निग्धांशांचे संपृक्त अन् असंपृक्त असे दोन प्रकार असतात. यात संपृक्त स्निग्धांशांपासून कोलेस्टेरॉल जास्त वाढत असल्याने त्याचे आहारातील प्रमाण अगदी कमी असावे, कारण त्यातूनच पुढे कोलेस्टेरॉल तयार होते. प्राणीज स्निग्धांश जे लोणी, तूप, अंड्यातील बल्क हे मुख्यत: संपृक्त स्निग्ध आम्लांचे बनलेले असतात. शेंगदाणा, करडई, सूर्यफूल तेल मुख्यत: असंपृक्त स्निग्धाम्लांनी बनलेले असतात. यातूनही थोडे कोलेस्टेरॉल वाढतेच. यामुळे एकूणच हृदयविकार असणाऱ्यांनी तेलाचा वापर अगदी कमी प्रमाणात करायला हवा.
-डॉ. संदेश जोशी, सीएचओ
लाकडी घाण्याच्या तेलाचा पर्याय
रिफाइंड तेल केमिकलशिवाय तयार होत नाही. गंधहीन असते, म्हणजेच त्यात प्रोटीन शिल्लक नसतात. शिवाय व्हिटॅमिन ई, मिनरल्स, फॅटी ॲसिड नसतात. यातून हृदयरोगासह अनेक गंभीर आजार उद्भवतात. यामुळे आम्ही कळंब येथे आरोग्यदायी असे अमृतधारा घाण्याचे तेल उपलब्ध करून दिले आहे. पूर्वंजाची देण असलेल्या लाकडी घाण्याचे तेल शुद्ध, सकस, नैसर्गिक व पौष्टिक असते.
-स्वप्नील मांडवकर, लाकडी घाणा चालक, कळंब