उमरगा : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्म क्रांतीला गतिमान करण्यासाठी प्रत्येकाने धम्माचे काटेकोर आचरण करावे. धम्म जीवन जगण्याचे बळ देतो. तसेच नवसंजीवनीही देतो. आपल्या संसारातील दुःख नाहीसे करण्यासाठी बुद्ध शिकवणीचे आचरण करावे, असे प्रतिपादन भन्ते सुमेध नागसेन यांनी केले.
तालुक्यातील दाळिंब येथील भीमनगरमध्ये माघ पौर्णिमेच्या निमित्ताने शनिवारी तथागत भगवान बुद्धांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. यावेळी भन्ते धम्मसार, भन्ते सुमेध नागसेन यांनी पालीपूजा घेऊन मूर्तीची स्थापना केली. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद अध्यक्षा प्रा. अस्मिता कांबळे, समाज कल्याण सभापती दिग्विजय शिंदे, पं. स. सभापती सचिन पाटील, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष कैलास शिंदे, भारतीय बोद्ध महासभेचे अध्यक्ष प्रा. डी. ए. निकाळजे, सुरेश वाले, बाबा जाफरी, सरपंच सोमनाथ कुंभार, जि. प. सदस्य धनराज हिरमुखे, उपसरपंच इरफान जहागीरदार, ग्रामविकास अधिकारी भास्कर वैराळे, आदींची उपस्थिती होती.
यानिमित्त सकाळी राष्ट्रीय महामार्गावरील शासकीय विश्रामगृहापासून बुद्धमूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. ‘बुद्धम् - शरणम् - गच्छामी’चा घोष करीत शुभ्र वस्त्र परिधान करून बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास भीमनगर येथील बुद्ध विहारात मूर्तीची स्थापना करण्यात आली. यावेळी भन्ते धम्मसार, दिग्विजय शिंदे, बाबा जाफरी, डी. ए. निकाळजे, संतोष सुरवसे, सचिन पाटील, भास्कर वैराळे, आदींची भाषणे झाली. या कार्यक्रमासाठी बोधिसत्व बुद्ध विहार चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी संदीपान सुरवसे, भीमाशंकर सूर्यवंशी, प्रा. दिगंबर गायकवाड, खंडेराव सुरवसे, सुधाकर गायकवाड, विश्वंभर गायकवाड, अभिमन्यू गायकवाड, आदींनी पुढाकार घेतला. सूत्रसंचालन जी. एल. कांबळे यांनी केले. अभिमन्यू गायकवाड यांनी आभार मानले.