लोकमत न्यूज नेटवर्क
तेर : उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील ऐतिहासिक वारसा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बौद्ध स्तुपाचे (चैत्यगृह) चित्र लोकसहभागातून पालटत आहे. त्यामुळे हा परिसर निसर्गरम्य होत असून, पर्यटक याकडे आकर्षित होताना दिसत आहेत.
सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वीचा वारसा सांगणारे तेर येथील हे बौद्ध स्तुप (चैत्य गृह) आहे. राज्य पुरातत्व विभागाच्यावतीने या स्थळाला संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले असून, याठिकाणी पर्यटक तसेच देश-विदेशातील अभ्यासकांची सतत वर्दळ असते. तेरमध्ये प्राचीन काळापासून विदेशी व्यापारी संबंध होते. दोन हजार वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक वारसा सांगत आजही येथे अनेक देवालये उभी आहेत. पुरातत्त्व विभागाने सन २०११मध्ये हे बौद्ध स्तुप पर्यटकांना पाहण्यासाठी खुले केल्यानंतर या ठिकाणी छत, संरक्षक भिंत आदी विकासकामे करण्यात आली.
दरम्यान, मागील दोन - तीन महिन्यांपासून लोकसहभागातून येथे गुलाब, मोगरा, मोरपंख आदी शोभेची झाडे लावणे, फुलांच्या झाडाच्या कुंड्या ठेवणे आदी कामे करण्यात येत आहेत. यामुळे या चैत्यगृहाचे रूपडे पालटत असून, येथील वातावरण अधिकच निसर्गरम्य होत आहे. आगामी काळात लोकसहभागातूनच या ठिकाणच्या छताची दुरुस्ती, संरक्षक भिंतीची रंगरंगोटी तसेच सीसीटीव्ही कॅमेरे, माहिती फलक बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. भारत मुक्ती मोर्चाच्यावतीने याठिकाणी सामाजिक दायित्व अंतर्गत पहारेकऱ्याचीही नियुक्ती झाल्याने देखभालीचा प्रश्न सुटला आहे.
कोट.....
कुठलाही ऐतिहासिक वारसा जतन करताना त्यात लोकसहभाग असेल तरच त्याचे महत्त्व वाढते. तेर येथील बौद्ध स्तुपाचे (चैत्यगृह) चित्रही आता लोकसहभागातून बदलत आहे. याठिकाणी विविध प्रकारची शोभेची झाडे लावल्यामुळे परिसर निसर्गरम्य झाला असून, इतर कामेही हाती घेण्यात आली आहेत.
- अमोल गोटे, सहाय्यक अभिरक्षक, वस्तू संग्रहालय, तेर