उमरगा - तालुक्यात व शहरात कोरोना संक्रमण झालेल्या रुग्णाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना क्रिटीकल रूग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा भेडसावत आहे. ही गैरसाेय लक्षात घेऊन आमदार चाैगुले यांनी उपजिल्हा रूग्णालयात ऑक्सिजन टॅक उभारणीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, अशी सूचना जिल्हाधिकारी यांना केली हाेती. त्यांनी प्रस्ताव पाठविल्यानंतर शासनस्तरावर पाठपुरावा केला असता, सुमारे १ काेटी २० लाख रूपये टॅंक उभारणीस मंजूर करण्यात आले आहेत. १२५ जम्बाे सिलिंडर भरण्याची या टॅंकची क्षमता आहे.
उमरगा- लोहारा तालुक्यात मागील एक वर्षापासून कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अनेक रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे.परंतु, आवश्यक क्षमतेच्या तुलनेत ऑक्सिजन साठा कमी पडत असल्याने अनेक रूग्णांची गैरसोय होत आहे. उमरगा व लोहारा तालुक्यासाठी आवश्यक ऑक्सिजन सिलिंडर तामलवाडी येथील केंद्रातून रिफिल करून मिळतात. परंतु या ठिकाणी कमी क्षमता असल्याने ऑक्सिजनची कमतरता भासत होती. सदरील अडचण लक्षात घेऊन मागील आठवड्यापासून उमरगासाठी लातूर व जालना येथून ऑक्सिजन रिफिल करून मिळण्याची परवानगी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून आ.ज्ञानराज चौगुले यांनी घेतली होती. परंतु सध्या सर्वत्रच रुग्णसंख्या वाढल्याने ऑक्सिजनची कमालीची कमतरता भासत आहे. ही गरज ओळखून उपजिल्हा रुग्णालय उमरगा येथे ६०० एलपीएम क्षमतेचे ऑक्सिजन टॅंक उभारणीबाबत परवानगी मिळावी, यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याची सूचना आ. चाैगुले यांनी जिल्हाधिकारी यांना केली हाेती. त्यानुसार प्रस्ताव पाठविला असता, आ. चाैगुले यांनी मंत्री राजेंद्र शिंगणे, राजेश टाेपे यांच्याकडे पाठपुरावा केला असता, २३ एप्रिल राेजी ऑक्सिजन टॅंक उभारणीस मंजुरी देण्यात आली. हा प्लॅन्ट दोन ते तीन आठवड्यात सुरू हाेईल, असा विश्वास आ. चाैगुले यांनी व्यक्त केला.