वेतनवाढ बंदचे आदेश रद्द करण्याची मागणी
उस्मानाबाद : संगणकीय प्रणालीद्वारे बदली प्रकरणात कायमस्वरूपी वेतनवाढ बंदचे आदेश रद्द करावेत, अशी मागणी आ. सतीश चव्हाण यांच्याकडे करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ५३ शिक्षकांच्या वेतन वाढ कायमस्वरूपी बंदचे आदेश हे आहेत. त्यापैकी २५ शिक्षकांनी अपील केले आहे. अशा शिक्षकांच्या वेतनवाढी पूर्ववत चालू व्हाव्यात व कारवाईचे आदेश रद्द करावेत, अशी मागणी शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष कल्याण बेताळे यांनी या निवेदनात केली आहे. यापूर्वीही आ. ज्ञानराज चौगुले यांनी शिक्षक समितीच्या मागणीनुसार ग्रामविकास राज्यमंत्री यांना पत्र देऊन मागणी केली असल्याचे बेताळे यांनी म्हटले आहे.
‘अंगणवाडी कार्यकर्तीच्या नियुक्तीची चौकशी करा’
लोहारा : तालुक्यातील वडगाव गांजा येथील अंगणवाडी कार्यकर्ती खोटी कागदपत्रे सादर करून २८ वर्षांपासून सेवेत असल्याचा गंभीर आरोप करीत याच्या चौकशीची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस हणमंत दणाणे यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. वडगाव गांजा येथील अंगणवाडी क्रमांक ११ मध्ये कागदोपत्री नोंद व प्रत्यक्षात कार्यरत असलेल्या महिलेची नावे वेगवेगळी असून, त्यांनी घरकुल योजनेचादेखील लाभ घेतला असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.