तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील गोंधळवाडी येथील अंगणवाडी क्र. ५०२ च्या इमारतीच्या छताचा गिलावा ढासळल्याची घटना शुक्रवारी घडली. यानंतर अधिकाऱ्यांनी अंगणवाडीला भेट देऊन पाहणी करणे अपेक्षित होते. मात्र, तसे न करता केवळ अंगणवाडी पर्यवेक्षिकांना येथे पाठवून घटनेचा आढावा घेण्यात आला.
गोंधळवाडी येथील अंगणवाडी इमारतीसाठी शासनाकडून ५ लाख ३० हजारांचा निधी ग्रामपंचायतीस प्राप्त झाला होता. यानंतर ग्रामपंचायतीने इमारत बांधकामाची निविदा ऑनलाईन प्रसिद्ध केली. त्याद्वारे बांधकामाचा ठेका नितीन बाळासाहेब कुंभार यांना मिळाला. इमारत बांधकाम पूर्ण झाल्यानंतर नऊ महिन्यांपूर्वी इमारतीचे हस्तांतरण करण्यात आले. परंतु, बांधकामाच्या दर्जाबाबत अधिकाऱ्यांनी पाहणी केली नाही. परिणामी शुक्रवारी या इमारतीच्या छताखालील गिलावा कोसळला. ही घटना घडल्यानंतर अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी करणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी पर्यवेक्षिका ढवळशंख यांना अंगणवाडीस भेट देण्यासाठी पाठविले. त्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.