कुठल्याही वाहनाचा चालक हा शारीरिकदृष्ट्या सुदृढ असावा, असा नियम आहे. त्यामुळे चाळिशीनंतर वाहन चालविण्याचा परवाना हवा असल्यास यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक करण्यात आले आहे. हे प्रमाणपत्र देण्यासाठी डॉक्टरांना देखील आरटीओ कार्यालयाकडे नोंदणी करून युजर आयडी आणि पासवर्ड घ्यावा लागणार असून, हे प्रमाणपत्र ऑनलाईन देण्यात येणार आहे. त्यामुळे बोगसगिरीला देखील लगाम बसणार आहे. एखाद्या डॉक्टरला दिवसातून किती प्रमाणपत्रे देता येतील, यावरही निर्बंध राहणार आहेत.
लर्निंग लायसन्स ऑनलाईन
आरटीओ कार्यालय हे एजंटांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी शासन वेगवेगळ्या प्रकारे त्यांना लगाम घालण्याचा प्रयत्न करीत आहे. लर्निंग लायसन्सही ऑनलाईन करण्यात आले आहे. त्याचबरोबर इतर वाहन नोंदणी, फिटनेस सर्टिफिकेट आदींना देखील ऑनलाईन नोंदणीच करावी लागत आहे.
किती वयापर्यंत मिळते लायसन्स
वाहन चालविण्याचा परवाना काढण्यासाठी आता चाळिशीनंतर नोंदणीकृत डॉक्टरांचे सर्टिफिकेट असणे बंधनकारक केले आहे. वयाच्या शंभरीनंतरही आपण वाहन चालविण्याचा परवाना घेऊ शकतो. परंतु, त्यासाठी डॉक्टरांकडून फिटनेस सर्टिफिकेट घेणे आवश्यक आहे.
एका डॉक्टरला दिवसाला २० प्रमाणपत्रे देता येणार
पूर्वी आरटी कार्यालयाच्या समोर डाॅक्टरांसह सर्वच प्रकारची प्रमाणपत्रे तात्काळ मिळायची.
शासनाने ऑनलाईनला प्राधान्य दिल्याने अनेकांची दुकाने बंद झाली. एजंटांची संख्याही घटली आहे.
दिवसभरात किती प्रमाणपत्रे द्यायची यावरही आता डॉक्टरांना निर्बंध घातले जाणार आहेत.
वयाची चाळिशी गाठलेल्यांना नव्या वाहन परवान्यासाठी किंवा परवान्याच्या नूतनीकरणासाठी तसेच आंतरराष्ट्रीय वाहन परवान्यासाठी एमबीबीएस असलेल्या डॉक्टरांचे फिटनेस सर्टिफिकेट गरजेचे असते. त्याशिवाय परवान्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही.
- गजानन नेरपरगार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, उस्मानाबाद