नौशाद उस्मान : ‘अंधारातून प्रकाशाकडे’ मोहिमेचा समारोप
उस्मानाबाद : भारत हा बहुसंस्कृतीचा देश आहे. इथे धर्म, जात, विचारधारा, खान-पान अशा प्रत्येक बाबतीत विविधता आढळते. ही विविधताच या देशाची शान आहे. मतभेद असणे साहजिक आहे; परंतु मतभेदामुळे मनभेद होता कामा नये, असे मत नौशाद उस्मान यांनी व्यक्त केले.
जमात-ए-इस्लाम हिंदच्या उस्मानाबाद शाखेच्या वतीने ‘अंधारातून प्रकाशाकडे’ ही राज्यव्यापी मोहीम राबविण्यात आली. याचा समारोप येथील औषधी भवन येथे पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, नाना घाटगे, माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, आशिष मोदाणी, मसूद शेख, नायब तहसीलदार मुस्तफा खोंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
नौशाद उस्मान म्हणाले, एक-दुसऱ्याप्रति घृणा, तिरस्कार आणि गैरसमज निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींना आपल्या समाजाने नाकारले पाहिजे. प्रेम, सद्भावना आणि एकमेकांविषयी विश्वास निर्माण करण्याची आज समाजाला गरज आहे. अनैतिकता, अज्ञान आणि अराजकतेच्या अंधारातून बाहेर पडण्याकरिता परमेश्वराने दाखविलेला मार्ग आपल्याला मार्गदर्शक ठरेल.
यावेळी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, मुस्तफा खोंदे, नाना घाटगे यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन साहेबलाल तांबोळी केले, तर आभार रियाज शेख यांनी केले. कार्यक्रमासाठी एसआयओ जमात-ए-इस्लाम हिंदच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.