देशभरात कोरोनाचे रुग्ण आढळून येऊ लागल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली. स्थानिक प्रशासनाने तातडीने उपाययोजना हाती घेतल्या. या काळात आरोग्यसेविका सोनालीताई सगर यांनीही गावात बाहेरगावावरून आलेल्या नागरिकांना सक्तीने आरोग्यतपासणी करण्यास भाग पाडली. त्यात दिल्ली येथून आलेला व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे सदरील रुग्णास उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठवत असताना त्याही संपर्कात आल्याने त्यांच्यासाठी संसर्गाचा धोका बळावला. संसर्गाच्या भीतीने त्यांना आपल्या घरीही जाता येत नव्हते. त्यामुळे जवळपास दीड महिना कुटुंबापासून अलिप्त राहून त्यांनी अशाही परिस्थितीत कर्तव्यात कसूर न करता बलसूर गावात आरोग्य तपासणी सर्वे, कडक लॉकडाऊन, विलगीकरणची मोहीम तसेच संपर्कात आलेल्या संशयितांची तपासणी मोहीम राबविली. यामुळे पहिला रुग्ण आढळल्यापासून पुढील तीन महिने गावात एकही कोरोना रुग्ण आढळला नाही.
कालांतराने कोरोनाची भीती थोडीशी कमी झाल्यानंतर दीड महिन्यानंतर घरात प्रवेश करताना रस्त्यावर उभे टाकून कुटुंबीय पाईपद्वारे पाणी मारून अंघोळ घालून घरात प्रवेश देत. यानंतर साधारणतः एक महिना अशाच स्वरूपाने घरात प्रवेश मिळायचा. पहिला रुग्ण सक्तीने तपासणीसाठी पाठवून व त्यानंतर गावात साधारण तीन महिने एकही रुग्ण संसर्गित होऊ न देता ही साखळी तोडण्यात यंत्रणेला यश आले. तसेच आरोग्यसेवेचे व्रत हाती घेऊन बलसूर गावाची सेवा केली, हे आरोग्यसेवेतील योगदानच म्हणावे लागेल.
चौकट..........
आरोग्य संवर्धनासाठी सदैव तत्पर राहू
उस्मानाबाद जिल्ह्यातील पहिला रुग्ण मी नियुक्त असलेल्या बलसूर गावात आढळला. प्रशासनासह आरोग्य यंत्रणेवर याचा मोठा ताण असतानाही योग्य नियोजन, व्यवस्थापन व सातत्य यामुळे कोरोना संसर्गावर प्रतिबंध घालता आला. स्वतःपेक्षा देश व कर्तव्य याला प्राधान्य दिल्यास हे सहजशक्य आहे. यापुढेही कोरोना विरुद्ध असलेल्या आरोग्य विभागाच्या लढाईत आम्ही कर्तव्याला प्राधान्य देऊ. जनसामान्यांच्या आरोग्य संवर्धनासाठी सदैव तत्पर राहू, अशी ग्वाही सोनाली सगर-पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
पॉईंटर
बलसूर गावात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर सर्वत्र चिंतेचे वातावरण होते. या रुग्णाला उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना आरोग्यसेविका सोनालीताई सगर याही रुग्णाच्या संपर्कात आल्याने नागरिक, कर्मचारी, नातेवाईक, सहकारी यांचा सोनालीताई यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पुरता बदलला होता. मात्र, सगर यांनी कुटुंबासून दूर राहून आपले कर्तव्य बजावले.