उस्मानाबाद : रस्ता सुरक्षाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी उप प्रादेशिक परिवहन विभाग व पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी शहरातून हेल्मेट दुचाकी रॅली काढण्यात आली. या रॅलीत दुचाकी चालकांनी सहभाग नोंदविला हाेता.
जिल्ह्यात ३२ व्या रस्ता सुरक्षा सप्ताहास १८ जानेवारीपासून प्रारंभ झाला आहे. १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी दरम्यान वाहतूक नियमांबाबत जनजागृतीपर विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. २८ जानेवारी रोजी हेल्मेट वापराविषयी जनजागृतीसाठी हेल्मेट दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीस उप प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांनी हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केले. रॅली उप प्रादेशिक परिहवन कार्यालय, तेरणा चौक, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, बार्शी नाका, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज चौकात समारोप झाला. या रॅलीत ४० महिला व पुरुष सहभागी झाले होते. रॅलीसाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक प्रियदर्शनी उपासे, मोटार वाहन निरीक्षक प्रशांत भांगे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक शेखर आचार्य तसेच कार्यालयातील कर्मचारी, मोटार ड्रायव्हिंग स्कूल चालक उपस्थित होते.