३३९ याेजनांची कामे हाेणार कधी?
जिल्ह्यातील अनेक गावांसाठी यापूर्वीच पाणीपुरवठा याेजना राबविण्यात आल्या आहेत. यातील काही याेजना विहिरीला पाणी नसल्याने बंद आहेत. काही याेजनांसाठी अतिरिक्त टाकीची गरज आहे. काही याेजनांसाठी वाढीव पाइपलाइन हवी आहे. अशा ३३९ पाणी याेजनांची कामे मंजूर आहेत. नवीन याेजनांच्या बाबतीत उदासीन असलेले प्रशासन ही कामे कधी पूर्ण करणार, असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
अधिकाऱ्यांनी वाचला कारणांचा पाढा...
जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी कार्यकारी अभियंता देवकर यांना आपल्या कार्यालयात बाेलावून याेजनांचा सर्व्हे पूर्ण हाेणार कधी, असा सवाल केला. यावेळी माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील याही उपस्थित हाेत्या. यावेळी देवकर यांनी कारणांचा पाढाच वाचला. आमच्याकडे मनुष्यबळ कमी आहे, काेराेनाचा काळ हाेता, सरकारने सर्व्हेसाठी एजन्सी नेमली नाही, अशी एक ना अनेक कारणे दिली. त्यांनी वाचलेल्या या कारणांच्या पाढ्यामुळे पदाधिकारी हतबल झाल्याचे पहावयास मिळाले.