लोहारा : शहरातील प्रभाग क्रमांक ६ मधील सिमेंट गटारीचे काम अर्धवट झाल्याने यात घाण पाणी साचले आहे. याबाबत वारंवार तक्रार करूनही नगरपंचायतीकडून दुर्लक्ष केले जात असल्याने संतप्त नागरिकांनी प्रजासत्ताक दिनी गटारीला पुष्पहार घालून गांधीगिरी केली.
शहरातील महात्मा फुले चौकातून रजिस्ट्री ऑफिसकडे जाणाऱ्या रस्त्यालगत प्रभाग क्रमांक ६ मधील गटारीचे घाण पाणी रस्त्याच्या कडेला व लोहारा हायस्कूल शाळेच्या मैदानात साचत आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. याच रस्त्यावरून खाजगी दवाखाने, रजिस्ट्री ऑफिस, भूमी अभिलेख कार्यालयाकडे जाणाऱ्या-येणाऱ्या नागरिकांची सतत वर्दळ असते. शाळेच्या मैदानावर पहाटेपासून मुले क्रिकेट खेळण्यासाठी येतात. त्यामुळे मुलांनाही दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असून, यातून आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे.
नगरपंचायत प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी अर्धवट गटारीला पुष्पहार घालून गांधीगिरी केली. यावेळी विनोद लांडगे, दादा मुल्ला, आतीक चाऊस, सचिन ठेले, बिजू चाऊस, संगिता स्वामी, परविन आरब, रेश्मा आरब आदी नागरिक उपस्थित होते.