भूम तालुक्यात ईट ही मोठी ग्रामपंचायत असून, येथी व्यापारपेठ ही मोठी आहे. व्यापाऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन येथे व्यापारी संकुलाच्या उभारणीसाठी जिल्हा परिषद ग्रामविकास निधीतून सन २०१८ मध्ये ग्रामपंचायतीने ३६ लाख रुपयांचा निधी कर्ज म्हणून घेतला होता. गाळे बांधकाम होऊन ते व्यापाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, घेतलेल्या कर्जापोटी काही दिवसांपूर्वी सात लाख रुपयांची रक्कम ग्रामपंचायतीने भरणा केला होता. यापाठोपाठ चार दिवसांपूर्वी उर्वरित कर्जापैकी दहा लाख रुपयांचा धनादेश भूमचे गटविकास अधिकारी बी. आर. ढवळशंख यांच्याकडे सरपंच संजय असलकर, सदस्य सयाजी राजे हुंबे, सुनील देशमुख, ग्रामविकास अधिकारी मुकुंद देशमुख यांनी सुपुर्द केला.
अवघ्या पाच महिन्यांमध्ये घेतलेल्या कर्जापैकी १७ लाख रुपये कर्जाचा भरणा ग्रामपंचायतीने केला असून, उर्वरित कर्जही लवकरच भरून विकासाची कामे प्राधान्याने केली जातील. यासाठी नागरिकांनी वेगवेगळे कर तसेच राहिलेली अनामत रक्कम भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच संजय असलकर यांनी केले आहे.