तामलवाडी : सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर सांगवी (काटी) शिवारात २३ जानेवारी रोजी कारच्या धडकेत पादचारी महिलेचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर कारचालक वाहनासह फरार झाला होता. पोलिसांनी तीन दिवसांत या कारचा शोध घेऊन चालकासह कार ताब्यात घेतली.
२३ जानेवारी रोजी सायंकाळी सुरतगाव येथील कुंडलिक गुंड व त्यांच्या पत्नी दीपा गुंड हे दांपत्य सांगवी येथे जावाई व लेकीला भेटण्यासाठी जात होते. यावेळी सोलापूरहून तुळजापूरकडे जाणाऱ्या कारने दीपा यांना पाठीमागून जोराची धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर कारचालक वाहनासह पसार झाला होता. पोलिसांनी याचा तपास लावून अपघातग्रस्त कारसह (क्र. एमएच १२ क्यूएम ५२३६) व चालक संतोष बुवासाहेब तरडे यास पुण्यातून ताब्यात घेतले. मंगळवारी तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दत्तात्रय काळे, बीट अंमलदार गोरोबा गाढवे यांनी केली.