भूम : केंद्र सरकारकडून करण्यात आलेले तीनही कृषी कायदे अन्यायकारक आहेत. या कायद्यांमुळे शेतकरी देशाेधडीला लागणार आहे. त्यामुळे हे कायदे मागे घ्यावेत, या प्रमुख मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. शुक्रवारी भूम, वाशी तसेच लाेहारा येथे धरणे आंदाेलन करण्यात आले.
काेराेनामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. अर्थकारण पूर्णपणे काेलमडून पडले आहे. असे असतानाच केंद्रातील माेदी सरकारने शेतकरी विराेधी कायदे केले आहेत. हे कायदे देशातील बड्या उद्याेजकांना डाेळ्यासमाेर ठेवून केले आहेत. या माध्यमातून देशातील गाेरगरीब शेतकरी उद्ध्वस्त हाेणार आहे. या कायद्याच्या विराेधात दिल्लीसह देशाच्या विविध भागात आंदाेलने करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांच्या या आंदाेलनाला पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एक दिवसीय धरणे आंदाेलन करण्याचे आवाहन केले हाेते. त्यानुसार वंचित आघाडीचे मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदाेलन करण्यात आले. भूम येथील आंदाेलनात मुकुंद लगाडे, संतोष इटकर, दत्तात्रय शिंदे, मुसा शेख, महावीर बनसोडे, अमोल इनामदार, वैभव गायकवाड, दीपक इजगज, शिध्दोधन सरवदे, यश शिंदे, अंकुश थोरात, अनिल भालेराव, पंचशील गायकवाड, शिवाजी पायाळ आदी सहभागी झाले हाेते.