पाटील विद्यालयात झाले व्याख्यान
मुरूम : येथील माधवराव पाटील महाविद्यालयाच्या सभागृहात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त व्याख्यानाचा कार्यक्रम घेण्यात आला. अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डाॅ. महेश माेटे यांनी ‘डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक धाेरण व बदलती आव्हाने’ या विषयावर व्याख्यान दिले. याप्रसंगी प्राचार्य डाॅ. अशाेक सपाटे, डाॅ. बिराजदार, डाॅ. संजय गुरव, डाॅ. सुधीर पंगल्ले, डाॅ. शीला स्वामी, डाॅ.साेमनाथ बिराजदार आदींची उपस्थिती हाेती.
परंडा येथील किल्ल्यात स्वच्छता माेहीम
परंडा : शहरातील ऐतिहासिक भुईकाेट किल्ल्यात जय शंभुराजे परिवार ग्रुपच्या वतीने साेमवारी स्वच्छता माेहीम राबविण्यात आली. यावेळी ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी किल्ला परिसरातील वाळलेली झाडेझुडपे काढून टाकली. या माध्यमातून गडसंवर्धनाचा संदेश देण्यात आला. या उपक्रमात इतिहासप्रेमी, मावळ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शंभुराजे ग्रुपच्या वतीने संस्थापक अध्यक्ष विठ्ठल शिंदे यांनी केले आहे.
वृक्षलागवड कामाची चाैकशी करा
लाेहारा : साेलापूर-हैदराबाद महामार्गालगत वृक्ष लागवड केल्याचे दाखवून गैरप्रकार केल्याचा आराेप सामाजिक कार्यकर्ते दिलीप जाेशी यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चाैकशी करण्यात यावी. अन्यथा २६ जानेवारी राेजी जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर झाेप काढाे आंदाेलन करण्यात येईल, असा इशारा जाेशी यांनी दिला आहे. त्यामुळे या प्रकरणात काय हाेते, याकडे परिसरातील लाेकांच्या नजरा लागल्या आहेत.
आग लागून उसाचा फड खाक
आनाळा : परंडा तालुक्यातील इनगाेंदा येथील शेतकरी महादेव कुंडलिक गवळी यांच्या शेतातील उसाच्या फडाला गुरुवारी अचानक आग लागली. या घटनेत सुमारे एक एकर क्षेत्रावरील ऊस जळून खाक झाला. यात शेतकरी गवळी यांचे तब्बल सव्वालाख रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचा पंचनामा करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी गवळी यांनी केली आहे.