उस्मानाबाद : उस्मानाबाद शहरातील सांजा चौक परिसरात एका ट्रक चालकास मारहाण करुन ट्रक पळवून नेणाऱ्या दोघास पोलिसांनी पाठलाग करुन बेड्या ठोकल्या. ही कारवाई उस्मानाबाद शहर पोलीस ठाणे व तुळजापूर ठाण्याच्या पथकाने केली.
२८ जानेवारी रोजी रात्री १ वाजण्याच्या सुमारास तुळजापूर पोलीस ठाण्याचे पोनि मनोजकुमार राठोड, सपोफौ शिंदे, पोहेकॉ सोनवणे, पोकॉ अमोल पवार यांचे पथक व उस्मानाबाद शहरातील गस्तीवर असलेले उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्याचे पोना भागवत शेंडगे, बागवान, गृहरक्षक दलाचे जवान गेजगे, येडके यांच्या संयुक्त पथकास सांजा चौक परिसरात कर्नाटक राज्यातील काशीनाथ राठोड हा जखमी अवस्थेत आढळला. पथकाने त्याची विचारपूस केली असता कार क्र. एमएच २४ व्ही ५७०० मध्ये दोन पुरुषांनी काशीनाथ राठोड यांची ट्रक क्र. केए ३२ सी ९७१९ ही आडवून त्यास लोखंडी गजाने मारहाण करुन ट्रक औसा रस्त्याने चोरुन नेल्याचे सांगण्यात आले. या माहितीच्या आधारे पथकाने लागलीच औसा रस्त्याने तपास सुरु केला.यावर पथकाने लागलीच औसा रस्त्याने तपास सुरु केला असता अंदाजे ९ किलोमीटर अंतरावर ती ट्रक व कार सोबत धावत असल्याचे आढळून आले. पथकाने त्यांना हटकून कसून चौकशी केली. संतोष प्रभाकर कुराडे, (रा. सुभाष नगर, अंकलखोप, जि. सांगली), उमेश भिमराव दाणे, (रा. उगलेवाडी, जि. सातारा) अशी नावे सांगितली. पथकाने उपरोक्त दोघांना चोरीच्या ट्रकसह चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेल्या कारसह ताब्यात घेतले. ट्रक चालक काशीनाथ राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन उपरोक्त दोघांविरुध्द आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.