तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी परिसरात मंगळवारी वेळामवास्या मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त हर हर महादेव, चांगभलंच्या गजराने शेतशिवार दुमदुमून गेला होता.
मंगळवारी दुपारी १२ वाजून २२ मिनिटांनी अमावास्येला प्रारंभ होणार असल्याने शेतकरी, महिला सकाळी १० पासून शेताच्या वाटेने रवाना होत होते. त्यामुळे गावे निर्मनुष्य झाली. मिळेल त्या वाहनाने तसेच पायी लोक जात होते. अमावास्येला प्रारंभ होताच बळीराजाने पांडव पूजा व शेतशिवारातील देवतांची पूजा करून काळ्या आईची प्रार्थना करून ज्वारीच्या ताटाचे पूजन केले. पूजापाठानंतर हरहर महादेव, चांगभलंच्या गजराने शिवारात बळीराजाची गर्जना गरजली. त्यानंतर सामुदायिक वन भोजनास प्रारंभ होऊन याकरीता मित्र, नातेवाईकास आमंत्रित करण्यात आले होते. बाळगोपाळांनी वनभोजनाचा आनंद घेतला. त्यानंतर बळीराजाने ज्वारीच्या शेतातून शिवार फेरी मारली.
(चाैकट)
असा होता मेन्यू
वेळामावास्येच्या भोजनात शेंगदाण्याच्या पोळ्या, पुरणपोळी, बाजरीची भाकरी, पालक, मेथी, चुका, हरभरा, तुरीचे, ओलसर दाणे, गाजर, वाटाणे यांची मिक्स भाजी. दह्याची कोथिंबीर, लसूण, जिरे घालून तयार केलेली आंबील अशा गावरान मेन्यूचा बेत शिवारात बळीराजाने केला होता.