भूम तालुक्यातील राज्यमार्ग क्रमांक १४२ हा तुळजापूर-शिडीॅ या दोन महाराष्ट्रातील मोठ्या देवस्थानांना जोडणारा मार्ग असल्याने येथून हैद्राबाद, कर्नाटक, आंध्रप्रदेशसह महाराष्ट्रातील हजारो प्रवासी वाहनधारक या मार्गावरुन प्रवास करतात. मात्र, खर्डा ते भूम दरम्यान ३० किलोमीटरचा प्रवास करताना खड्ड्यांच्या रस्त्याबरोबर साईडपट्यातील वाढलेले गवत, त्याचबरोबर दिशादर्शक फलकांच्या झालेल्या दुरवस्थेतेचाही सामना प्रवाशांना करावा लागत आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या दिशादर्शक फलकांचीही दुरवस्था झाल्याने वाहनधारकांना पुढील गावचे अंतर स्थानिकांना विचारावे लागते. मात्र, या दुरवस्थेकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्ण दुर्लक्ष झालेले आहे. याअनुषंगाने सोमवारी भाजपच्या वतीने पाथरुडे येथील चौकात दीड तास रास्ता रोको करुन बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यात आले. आंदोलनावेळी बांधकामच्या अधिकार्यांनी फोनवरून लवकरच रस्त्यावरील खड्डे बुजवून दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले. यानंतर हे आंदोलन थांबवण्यात आले. आंदोलनात सिताराम वनवे, भाजपा तालुकाध्यक्ष महादेव वडेकर, जिल्हा सरचिटणीस आदम शेख, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस भाऊसाहेब कुटे, सिताराम वणवे, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष अच्युत गटकळ, गणेश भोगील व पदाधिकारी उपस्थित होते.
रस्ता दुरुस्तीसाठी भाजपचा रास्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:34 IST