कळंब (जि. उस्मानाबाद) : मेडिकल ऑक्सिजनची गरज भागविण्यासाठी चोराखळी येथील धाराशिव साखर कारखान्याने पुढाकार घेतला आहे. राज्यातील पहिला पायलट प्रोजेक्ट म्हणून या कारखान्यातील या प्रकल्पाची नोंद झाली आहे. अन्न व औषध प्रशासनानेही सोमवारी या प्रकल्पाची पाहणी करून मंजुरी दिली आहे. त्यामुळे लवकरच येथे ऑक्सिजन निर्मिती सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कोविडच्या पार्श्वभूमीवर गंभीर रुग्णांना मोठ्या प्रमाणात मेडिकल ऑक्सिजनची गरज निर्माण झाली आहे. मागणीच्या तुलनेत निर्मिती व उपलब्धता नसल्याने अडचणी निर्माण झाल्या. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने राज्यातील साखर उद्योगांनी आपल्या कारखान्यात ऑक्सिजन निर्मिती करावी, यासाठी बैठक घेऊन आवाहन केल्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव साखर कारखान्याने पुढाकार घेतला. राज्यातील पहिला पायलट प्रोजेक्ट म्हणून त्याची नोंद झाली. लागलीच चेअरमन अभिजित पाटील यांनी या प्रकल्पाची उभारणी सुरू केली. आता काम जवळपास पूर्णत्वास आले असून, ‘ट्रायल’मधून उत्पादित होणारा ऑक्सिजन पनवेल येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. हे ऑक्सिजन वैद्यकीय वापरासाठी उपयुक्त असल्याचा प्रयोगशाळेचा अहवाल मिळाल्यास त्याचा प्रत्यक्ष रुग्णालयांमध्ये वापर सुरू होईल. प्रतिदिन २० टन ऑक्सिजन निर्मितीचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे उस्मानाबाद जिल्हा ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, ऑक्सिजन निर्मिती करण्यापूर्वी अन्न व औषध प्रशासनाची मंजुरी या प्रकल्पाला आवश्यक होती. नुकत्याच झालेल्या पाहणीदरम्यान, सर्व निकष पूर्ण रीत असल्याने या प्रकल्पास अन्न व औषध प्रशासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे येथून ऑक्सिजन निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे.