अणदूर : तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी येथे आदर्श शाळा निर्माण समिती, ग्रामपंचायत कार्यालय व शालेय व्यवस्थापन समिती पदाधिकारी यांची संयुक्त बैठक जि. प. शाळेत पार पडली. यावेळी विविध नावीण्यपूर्ण उपक्रम राबवून ही शाळा आदर्श करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
महाराष्ट्रातील ३०० शाळा आदर्श करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, यात खुदावाडी येथील शाळेचा ही समावेश आहे. यासाठी शाळा प्रशासन, ग्रामपंचायत कार्यालय व ग्रामस्थांनी सहभाग घेऊन शाळेचा चेहरा मोहरा बदलून टाकला आहे.
शाळांना विकसित करण्यासाठी शासनाने शाळेच्या भौतिक व शैक्षणिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता, प्रशासकीय बाबींची सुधारणा याचा समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांमध्ये समीक्षात्मक विचार, वैज्ञानिक प्रवृत्ती, संविधानिक मूल्ये, संभाषण कौशल्य विकसित होण्यासाठी खुदावाडी आदर्श शाळा निर्वाण समितीची स्थापना करण्यात आली.
बैठकीत लोकसहभागातून सव्वा दोन लाख रुपये जमा झाले असून, त्यातून शाळेची संरक्षक भिंत, अंतर्बाह्य सजावट, व्हरांड्यात फरशी, स्टेज, अपंगांसाठी रँप, शाळेच्या आवारात वृक्षारोपण, रंगीबेरंगी कुंड्यांमध्ये वृक्षारोपण, ग्रंथालयांची निर्मिती, आदर्श प्रयोगशाळा, विषयनिहाय स्वतंत्र कक्ष, जुन्या पौराणिक ऐतिहासिक साहित्य संग्रह आदी उपक्रम राबविण्यात आले आहेत. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. सिद्रामप्पा खजुरे, सरपंच शरद नरवडे, उपसरपंच पांडुरंग बोंगरगे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संगाप्पा चिंचोले, उपाध्यक्ष सुधाकर घोडके, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शिवाजीराव जवळगे, मुख्याध्यापक प्रकाश राठोड, वसंत कबाडे, नागनाथ जत्ते, जगन्नाथ राठोड, बालाजी काळे, सविता पुजारी, बाबासाहेब मोरे, रुक्मिणी बीटी, दमयंती गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.