उस्मानाबाद : दीर्घ प्रतीक्षेनंतर आता आजपासून प्रत्यक्ष कोविड लसीकरणास सुरुवात होत आहे. लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी ३०० जणांना डोस देण्यात येणार असून, त्यासाठी सर्व आवश्यक तयारी तिन्ही केंद्रांवर करण्यात आली आहे. शिवाय, शुक्रवारीच या लसी तिही केंद्रावर पोहोच करण्यात आल्या आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यातील फ्रंटलाईन कोरोना वारियर्सची कोविन ॲपवर नोंदणी करून घेण्यात आली आहे. सुमारे ९ हजार १०० जणांची नोंदणी पूर्ण झालेली असून, यातील आरोग्य सेवा क्षेत्रात काम करणाऱ्यांची संख्या ८ हजार २७२ इतकी आहे. शनिवारी प्रत्यक्षात या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणास सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी ड्राय रन यशस्वी झालेले असल्याने आता या प्रक्रियेत अडचणी जाणवण्याची शक्यता कमी दिसते. शनिवारी जिल्हा रुग्णालय, तसेच उमरगा व तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या केंद्रावर सकाळी नऊ वाजता लसीकरणाची प्रक्रिया सुरू होईल. साधारणत: दुपारी चार वाजेपर्यंत लाभार्थी येतील त्याप्रमाणे लसीकरण सुरू राहणार आहे. एका केंद्रावर एका दिवशी १०० जणांनाच ही लस देण्यात येईल. यानुसार पहिल्या ३०० जणांच्या लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. कोविन ॲपनेच लाभार्थ्यांची निवड होणार आहे. ज्यांचे शनिवारी लसीकरण नियोजित आहे, त्या संबंधितांना शुक्रवारी रात्रीपर्यंत मेसेज व अन्य माध्यमातून त्यांच्या लसीकरणाचे केंद्र व वेळेबाबत अवगत करून देण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
१८०० लसी झाल्या पोहोच...
उस्मानाबाद जिल्ह्यासाठी पहिल्या टप्प्यात १० हजार ५० लसी प्राप्त झाल्या आहेत. त्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान, यातील १८०० लसी या शुक्रवारी जिल्हा रुग्णालय व उमरगा, तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील केंद्रांना पोहोच करण्यात आल्या आहेत. प्रत्येकी ६०० लसी याप्रमाणे त्यांचे वितरण झाले आहे. या लसी संबंधित केंद्रांना पाच दिवस पुरतील इतक्या आहेत.
चार व्हॅक्सीनेटर तैनात...
लसीकरणासाठी प्रत्येक केंद्रावर चार प्रशिक्षित व्हॅक्सीनेटर तैनात करण्यात आले आहेत. शिवाय, एक तज्ज्ञ डॉक्टरही येथे हजर असतील. पहिली कर्मचारी यादी पाहून लाभार्थ्याची ओळख पटवेल. दुसरा कोविन ॲपवरील नोंदणीतून खात्री करून घेईल. तिसरा लाभार्थ्यांस लस देईल, तर चौथा लस घेतलेल्या व्यक्तीस कोविड उपाययोजनांची माहिती देईल. तज्ज्ञ डॉक्टर त्यांची विचारपूस करून सोडतील.
कोट...
लसीकरणाची संपूर्ण तयारी झाली असून, लसी तिन्ही केंद्रांवर शुक्रवारी पोहोच झाल्या आहेत. शनिवारी सकाळी प्रत्यक्षात लसीकरणास सुरुवात होईल. शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निर्देशानुसार लसीकरणाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
-डॉ. हनुमंत वडगावे, जिल्हा आरोग्य अधिकारी.