नवी मुंबई : पत्नीने लॉजवर परस्त्रीसोबत पकडल्याने पतीने ऐरोली खाडी पुलावरून बुधवारी मध्यरात्री उडी मारली. याबाबत माहिती मिळताच पोलिस व अग्निशमन दलाने दोन तास शोधमोहीम राबवली. तो वाहून गेल्याचे समजून तपास थांबवला, मात्र गुरुवारी सकाळी तो गाळात रुतलेल्या अवस्थेत आढळला.
ठाणे परिसरात राहणाऱ्या रिक्षाचालकाला त्याच्या पत्नीने बुधवारी चांगलीच अद्दल घडविली. पतीचे विवाहबाह्य प्रेमसंबंध असल्याची तिला माहिती मिळाली होती. यावरून तिने पतीवर पाळत ठेवून तो परस्त्रीसोबत लॉजवर गेल्याचे कळताच पत्नीने तिथे धाड टाकली. पतीचे बिंग फुटल्याने मध्यरात्रीच्या सुमारास पती रिक्षाने ऐरोली खाडी पुलावर आला. तिथून त्याने पत्नीला फोन लावून झालेल्या चुकीबद्दल माफी मागून खाडी पुलावरून आत्महत्या करत असल्याचे सांगितले. यावरून काही वेळातच त्याचे नातेवाईक ऐरोली खाडी पुलावर पोहोचले. दरम्यान रबाळे पोलिस व ऐरोली अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले.
अशी केली सुटकागुरुवारी सकाळी पुलापासून काही अंतरावर एक तरुण गाळात अडकून पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांचे पथक बोटीने गेले आणि त्याला बाहेर काढले. चौकशीदरम्यान गाळातून बाहेर काढलेली व्यक्ती खाडीपुलावरून उडी मारणारा महिलेचा पती असल्याचे उघडकीस आले.