औरंगाबाद : कन्नड उपविभागात कार्यरत असलेले उपविभागीय अभियंता हजर झाल्यापासून कार्यालयात वेळेवर थांबत नाहीत. लोकप्रतिनिधींना भेटत नाहीत. त्यामुळे सर्कलमधील अनेक कामे रखडली आहेत. असा आरोप करीत जिल्हा परिषद सदस्या संगीता चव्हाण आणि हिराबाई पवार यांनी मंगळवारी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मधुकर आर्दड यांच्या दालनासमोर दुपारनंतर ठिय्या आंदोलन केले. आंदोलक सदस्यांनी सीईओ आर्दड यांची भेट घेतली. भेटीअंती त्यांनी संबंधित अभियंत्यांचे तातडीने निलंबन करण्याची मागणी केली. संबंधित उपविभागीय अभियंत्याला याप्रकरणी जाब विचारण्यात येईल, असे सीईओंनी आंदोलक सदस्यांना सांगितले. उपविभागीय अभियंता हे मनमानी पद्धतीने कारभार करतात. कार्यालयात वेळेवर येत नाही. अनेक वेळा कार्यालयात थांबत नाहीत. संबंधित अधिकारी हे अंदाजपत्रक, तांत्रिक मान्यतेवर जाणीवपूर्वक उशिरा स्वाक्षऱ्या करतात. लोकप्रतिनिधींना भेट नाहीत. कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास देतात. त्यांच्याविरुद्ध कर्मचाऱ्यांनी तीन वेळा कामबंद आंदोलन केले आहे. एका अधिकाऱ्याच्या विरोधात जर वारंवार तक्रारी येतात. तरीदेखील प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सदस्यांनी केला. जिल्हा परिषदेत अलीकडे प्रशासन विरोधात सदस्य असे चित्र निर्माण झाले असून, क्षुल्लक कारणांमुळे वाद विकोपाला जाण्याचे प्रमाण वाढले आहे.
जि.प.सदस्यांनी केले ‘सीईओं’च्या दालनासमोर ठिय्या आंदोलन
By admin | Updated: August 17, 2016 00:51 IST