जालना : ३१ जुलै रोजीच्या सर्वसाधारण सभेत दुष्काळी प्रश्नावरून गोंधळ घालणाऱ्या विरोधी सदस्यांनी मंगळवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत तलवार म्यान करून काही सूचनांची अंमलबजावणी झाली पाहिजे, अशी भूमिका घेतली. विशेष म्हणजे आजच्या सभेत विरोधी सदस्यांपैकीच दोन सदस्य सभागृहात आम्हाला बोलू दिले जात नसल्याचे सांगत निघून जाण्याच्या प्रयत्नात होते, मात्र त्यांना थांबविण्यात गटनेत्यांना यश आले. जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात उपाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या अध्यक्षतेखाली सभेस प्रारंभ झाला. मुख्य कार्यकारी अधिकारी पे्ररणा देशभ्रतार, सभापती शीतल गव्हाड, वर्षा देशमुख, रुख्मीनी राठोड, बप्पासाहेब गोल्डे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख, कॅफो चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. गेल्या सभेत व सभेनंतर सत्ताधाऱ्यांवर विविध प्रकारचे आरोप करणाऱ्या विरोधी सदस्यांची धार या सभेत थंडावल्याचे दिसून आले. जिल्हा परिषदेस सन २०१४-१५ चे उपकराचे अंदाजपत्रक मंजूर झाल्यानंतर थकित वाढीव उपकर, सामान्य उपकर, जमीन महसूल अंतर्गत प्राप्त रक्कमांचे जि.प.,पं.स. अधिनियम १३८ अन्वये नियोजन करण्याचा विषय उपाध्यक्ष लोणीकर यांनी मांडला. १७ कोटी ९८ लाख ७४ हजार रुपयांच्या पूनर्विनियोजनात विविध खात्यांच्या तरतुदीसंदर्भात विरोधी सदस्यांनी सूचना मांडल्या. पावसाळा संपत आलेला असताना सिंचनामध्ये अधिक रक्कमेची तरतूद ठेवू नये, तसेच कलम १०० अन्वये प्रत्येक गटांसाठी भरीव तरतूद ठेवावी, अशी सूचना सतीश टोपे यांनी केली. प्रशासकीय, पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानांच्या दुरूस्तीवरील खर्च कमी करावा, असेही ते म्हणाले. सभेत सुमारे दीड तास विरोधी व सत्ताधारी पक्षातील काही सदस्यच बोलत असताना विरोधी पक्षातील अॅड. पंकज बोराडे व अॅड. संजय काळबांडे यांनीही आपले मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना थांबविण्याचा प्रयत्न झाल्याने अॅड. बोराडे संतप्त झाले. विषयपत्रिका टेबलावर आदळून त्यांच्यासह अॅड. काळबांडे यांनी सभागृह सोडण्याचा प्रयत्न केला. मात्र विरोधी गटनेते टोपे यांनी त्यांना विनंती करून थांबविण्यात यश मिळविले. (प्रतिनिधी)जिल्हा परिषदेच्या ज्या मालमत्ता आहेत, त्यांचे कर नियमित भरले जात नाहीत. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेकडे पैसे उपलब्ध असताना ते का भरले जात नाहीत, असा सवाल करून मालमत्ता कर नियमित भरावेत, अशी सूचना विरोधी गटनेते सतीश टोपे यांनी केली. ४या सभेत सतीश टोपे, अनिरूध्द खोतकर, संभाजी उबाळे, भगवानसिंग तोडावत, बाळासाहेब वाकुळणीकर, अॅड. संजय काळबांडे, एल.के. दळवी, अॅड. पंकज बोराडे, रामेश्वर सोनवणे यांनी चर्चेत सहभाग घेतला.