लातूर : सासरच्या जाचास कंटाळून जिल्ह्यातील दोन विवाहितांनी स्वत:ला जाळून घेतले आहे. यातील एका विवाहितेचा मृत्यू झाला, तर दुसरीवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अहमदपूर व किल्लारी पोलिस ठाण्यांत गुन्हे नोंद आहेत. टेंभुर्णी येथील विवाहिता सुमित्रा रवि कासले यांंना आरोपी रवि कासले व अन्य दोघांनी व्यापारासाठी माहेरहून ५० हजार रुपये आणण्याचा तगादा लावला होता. या पैशासाठी सातत्याने शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. या जाचास कंटाळून रविवारी सुमित्रा कासले यांनी स्वत:ला अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. या घटनेत पूर्णपणे जळाल्याने सुमित्रा यांचा मृत्यू झाला, अशी तक्रार किसन तिपण्णा मंजनर यांनी अहमदपूर पोलिसांकडे दिली आहे. त्यानुसार आरोपी रवि कासले व अन्य दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, जाऊवाडी येथील रुक्मिणबाई वाल्मिक घोलप (वय ३०) यांना लग्न झाल्यापासून सासरी किरकोळ कारणावरून जाच करण्यात येत होता. पती वाल्मिक प्रभू घोलप याच्यासह घरातील अन्य तीन सदस्य लहान-मोठ्या कारणावरून रुक्मिणबाई यांना अपशब्द वापरून अपमानित करीत होते. या जाचास कंंटाळून रुक्मिणबाई यांनी १५ मे रोजी राहत्या घरी अंगावर रॉकेल ओतून घेऊन पेटवून घेतले. या घटनेत त्या ३८ टक्के भाजल्या आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. किल्लारी पोलिसांनी आरोपी वाल्मिक घोलप व अन्य तिघांविरुद्ध सोमवारी गुन्हा दाखल केला आहे. जळाल्याने दोघींचा मृत्यू... निलंगा तालुक्यातील दगडवाडी येथील सोनाली विलास भोसले (वय २०) ही ९८ टक्के जळाली होती. तिला १२ मे रोजी उपचारासाठी लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. दरम्यान, निलंगा तालुक्यातील केळगाव येथील सोजरबाई सुरेश राठोड (वय ३५) या स्वयंपाकासाठी स्टोव्ह पेटवीत असताना भडका उडाला. त्यात सोजरबाई ६९ टक्के भाजल्या होत्या. त्यांच्यावर लातुरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याबाबत सोमवारी निलंगा पोलिसांत नोंद आहे.
जाचास वैतागून घेतले जाळून
By admin | Updated: May 21, 2014 00:15 IST