भूम : तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील मतमोजणीतून लागलेले निकाल अनेक मातब्बरांना धक्का देणारे लागले़ निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या युवकांनी ज्येष्ठांना आस्मान दाखवित विजयश्री खेचून नेली़ तर तालुक्यातील काही गावात मागील अनेक वर्षांपासून सत्तेत असलेल्यांनाही मतदारांनी पराभवाची धूळ चारली़भूम तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतीच्या ४४१ जागांसाठी १८१ मतदान केंद्रावर मंगळवारी मतदान प्रक्रिया झाली होती़ तालुक्यातील ७४ हजार ८६८ मतदारांपैैकी ६३९३१ मतदारांनी (८५़३९ टक्के ) मतदान केले होते़ सर्वांना उत्सुकता होती ती गुरूवारी होणाऱ्या मतमोजणीची! भूम येथे सकाळी मतमोजणीस प्रारंभ होण्यापूर्वीपासूनच ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती़ एकूण १४ टेबलावर २८ कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत मतमोजणी करण्यात आली़ प्रारंभी चिंचोली येथील ग्रामपंचायतीचा निकाल लागला़ सत्ताारी शिवसेना प्रणित महादेव वारे यांच्या पॅनलने पुन्हा एकदा ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यात यश मिळविले़ तर तालुक्यातील आष्टा ग्रामपंचायतच्या निवडणुकीत मागील २० वर्षापासून सत्तेत असलेल्यांना पराभवाची धूळ चारत राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित सिध्दीनाथ ग्रामविकास पॅनलने ग्रामपंचायतीवर कब्जा केला़ ईट येथे चौरंगी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब देशमुख पॅनलने आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले़ वालवड ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य दत्ताअण्णा मोहिते पॅनलने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलचा पराभव करून ग्रामपंचायतीवर भगवा फडकाविला़ पाथरूड ग्रामपंचातवर मागील २० वर्षापासून काँग्रेसची सत्ता होती़ यंदा उपसभापती रामकिसन गव्हाणे, संजय बोराडे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या पॅनलने ११ पैैकी १० जागा मिळविल निर्विवाद वर्चस्व प्रस्तापित केले आहे़ तालुक्यातील आरसोली ग्रामपंचायत निवडणुकीत आऱडी़सूळ यांच्या पॅनलने विजय मिळविला़ तर माणकेश्वर येथे बापूसाहेब आंधारे यांच्या राजनाथ ग्रामविकास आघाडी पॅनलने पुन्हा एकदा ग्रामपंचायत ताब्यात ठेवली आहे़ (वार्ताहर)
युवकांनी दाखविले ज्येष्ठांना आस्मान
By admin | Updated: August 7, 2015 01:13 IST